
माणसाचे कर्तृत्व घडविण्यासाठी व त्या कर्तृत्वापासून समाजाच्या भवितव्याची पहाट फुलवण्यासाठी त्या समाजाला दिशा दाखवणाऱ्या दर्शकाच्या अंगी दृष्टेपण असावं लागतं , असेच दृष्टेपण सहकार महर्षि शंकराराव नारायणराव मोहिते पाटील यांच्या अंगी होते म्हणूनच सहकारचं सोनं प्यायलेला हा अवघा सोलापूर जिल्हा आपला सहकारवारू वेगाने दौडताना दिसत आहे..
खरेतर सहकार सहकार म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा प्रत्येकाला पडतो, तेव्हा त्या प्रत्येकाला सांगावी अशी एक गोष्ट…
एका सभागृहात काही लोक एका ओळीत उभे होते त्यातील प्रत्येकाकडे एका हातात एक फुगा होता तर दुसर्या हातात एक एक टाचणी..आता त्यांना सांगितलं की ज्याच्या हातात फुगा राहील तो जिंकला. प्रत्येक जण दुसऱ्याचा फुगा फोडण्याचा प्रयत्न करू लागला आणि स्वतःचा फुगा मात्र वाचवू लागला.
आणि अशा तऱ्हेने एकेक करत सर्वांचे फुगे फुटले. आणी उरली मात्र प्रत्येकाच्या हातात टाचणी. आता प्रत्येकाला कळून चुकलं की आपण दुसऱ्यांचा फुगा फोडण्याचा नादात स्वतःच देखील नुकसान करून घेतले.
आणि सहकार महर्षींनी सर्वांना हेच सांगितलं कि बाबांनो जर स्वतः जिंकायचं असेल तर दुसऱ्यांना हरवून नाही तर एकमेकांना जिंकवून सहकार्य करून जिंकता येतं.
स्वतःसह दुसऱ्याचा देखील फुगा वाचवा. सर्वच जण जिंकतील. काकासाहेबांनी नेमकं हेच केलं इथं प्रत्येकालाच जिंकू दिलं..नव्हे त्याला जाणीव करून दिली.. जिंकण्याची….
इथला शेतकरी जिंकला पाहिजे, इथला कामगार जिंकला पाहिजे, इथला कष्टकरी जिंकला पाहिजे, इथला सर्वसामान्य जिंकला पाहिजे आणि हे प्रत्येकाचं जिंकणं आणि इतरांना जिंकवण म्हणजेच सहकार होय.
दणकट शरीरयष्टी, पहाडी आवाज आणि बोलणाऱ्याच्या काळजाला भिडणारी भाषा,असे व्यक्तिमत्व लाभलेले काकासाहेब. पुण्यासारख्या नावाजलेल्या वसंत व्याख्यानमालेत जेव्हा उभे राहतात तेव्हा, तमाम उपस्थितांची मने जिंकून घेतात. तेव्हा लक्षात येते काकासाहेबांचे चौफेर व्यक्तिमत्त्व. खरेतर काकासाहेब नुसते बोलत नव्हते तर ते कृतीत सुद्धा उतरवून दाखवायचे. मग सामाजिक बांधिलकी जपत केलेले इथले सहकाराचे प्रयोग असोत किंवा इथल्या प्रत्येकाच्या मनात केलेली स्वजाणीवीची मशागत असो.
आणि म्हणूनच कवी ना. धो. महानोर असे लिहतात ….
या नभाने या भुईला दान द्यावे,
अन् या मातीतून चैतन्याचे गाणे गावे,
कोणती पुण्ये अशी येती फळाला,
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे….!
हे जणू काकासाहेबांनी इथल्या मातीतून उगवलेलेले शब्द वाटतात…
हा काकासाहेबांचा वसा इथल्या पुढल्या पिढीने तितक्याच समर्थपणे पेललेला दिसतोय..प्रसंगी तुरुंगवास भोगलेले हे व्यक्तिमत्व,
सहकारी साखर कारखाना काढताना आलेल्या अनेक आर्थिक अडचणी,समाजकार्य करत असताना पावलोपावली भेटणारे समाजकंटक या साऱ्यांना काकासाहेब समाजसेवेची संधी समजत गेले.
एकदा एका लोखंडी डब्यात एक पारसमणी ठेवला होता, परंतु तरीही तो डबा लोखंडीच राहिला . कारण त्या पारसमणीभोवती एक कापडी चिंधी गुंडाळली होती. लोखंडाची पेटी आणि पारसमणी यांच्यामध्ये एक चिंधी होती. म्हणून ती लोखंडी पेटी सोन्याची होऊ शकत नव्हती. आणि काकासाहेबांनी नेमकं हेच केलं.. इथल्या सर्वसामान्यांच्या आयुष्याभोवती असणारी परिस्थितीची, गरिबीची, अज्ञानाची चिंधी दूर केली आणि सहकाराच्या परिसस्पर्शाने इथल्या प्रत्येक लोखंडी माणसाच्या आयुष्याचं सोनं केलं. तुम्हा-आम्हा सर्वांचं हे अहोभाग्य की शंकरराव मोहिते पाटील या परिसाचा स्पर्श इथल्या प्रत्येकाला झाला आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं झालं.
आज 11 फेब्रुवारी काका साहेबांची पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!
म्हणूनच काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहावे वाटते कि…..
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी….
माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!!!
—प्रा. देवानंद प्रदिप साळवे.
(महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर.)
-7028999292