*मराठीतून वैश्विकतेकडे…*
आज कवीश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच…….
” मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास,
वज्रासी भेदू कठीण ऐसे |”
संत तुकारामांची ही ओळ अगदी खरी खरी वाटते – मराठी भाषेसाठी आणि तितक्याच
‘ फणसाळ ‘ मराठी माणसांसाठी. कारण या दोहोंचेही वर्णन यथोचित आणि समर्पक शब्दात पूर्णतः उमजून केल्याचे जाणवते.
मराठी भाषा अशीच का बरे? हा न सुटणारा प्रश्न आहे. अनादि – अनंत काळापासून या भाषेची ‘फळे रसाळ गोमटी ‘ आपल्या मधुर स्वादाने तृप्त करण्याचे आनंददायी कार्य करताहेत. या भाषेत अनेक रत्ने जन्माला आली, त्यांनी ‘ सुंदर लेणी’ साकार केली. हे जितके रसाळ आणि मधाळ तितकचं मर्दानी, तळपते अन गर्जणारे सुध्दा लेखन याच भाषेत लखलखु लागले हेही नसे थोडके!
जन्मल्याबरोबर भाषा म्हणजे काय ? हे कळण्याअगोदरच ही भाषा आपल्या गळ्यात नकळत हात गुंफते अन प्रारंभ होतो,एक अनोख्या शब्दांच्या प्रवासाचा….. जो अखेरच्या श्वासापर्यंत ‘ गुंतता हृदय हे ‘ म्हणत साथ करते. प्रत्येक भाषा जन्मताच कानावर पडते. आईकडून- म्हणजेच मातेकडून म्हणून ती भाषा मातृभाषा ठरते, आणि भाषा नकळत बनू लागते स्पंदनाची, उलगडण्याची,जगण्याची आणि जाणिवांची .
म्हणूनच प्रत्येक भाषा बनते ती आईची, माझी, तुमची अन विश्वाची , ती विश्वरूपी बनू लागते ते अशा कारणांमुळे..
संतापासून सुरु झालेली ही मराठी भाषेची दैदिप्यमान परंपरा त्याचे आम्ही पाईक आहोत, हे अगम्य आणि अपरंपार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ‘ माझ्या मराठीची बोलू कौतुके ‘ पासून सुरेश भटांच्या ‘ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ‘ इथपर्यंतचा प्रवास हा न संपण्यासाठीचाच होता,कारण यश हा मुक्काम नाही तर तो प्रवास आहे अनंताचा…….
आमची भाषा समृद्ध झाली, संपन्न झाली आणि जागतिक सुद्धा….. पण आम्ही मराठीचे सत्व, मातृत्व जपण्यास समृद्ध ठरलो का? साहित्यिकांची अन प्रगल्भ वाचकांची नेमकी भूमिका आम्ही निभावू शकलो का ? मराठी भाषेचे ‘देणे ‘ पुरे करू शकलो का? वाचन संस्कृती वाढवू शकलो नाही, पण हरवू नये म्हणून जागलो का? ‘संस्कार नाहीतच हल्लीच्या पिढीवर ‘ म्हणून ओरडतो आपण, पण स्वतः ते पाळतो का? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातील ‘मराठी माणसाला’ तेही एका मराठी कडूनच….
खरेतर ज्याला ‘ नेटकं मराठी ‘ बोलता येत नाही, तो ‘अस्सल मराठी’ ही मराठीची व्याख्या आपल्याला लागू पडते, खरेतर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास या संताची मांदियाळी इथेच जन्मली,याच मराठी भाषेत. या साऱ्यांनी इतकं लिहीलं आहे की तेव्हापासून आतापर्यंत कोणीही ,काहीही लिहिले नसते तरी ठिक झाले असते.पण तरीही गडकरी, खाडिलकर, अत्रे असो यांच्यासारखे श्रेष्ठ नाटककार असो, मर्ढेकर, कुसुमाग्रज ,भट, बापट, यशवंत ते परवाच्या संदीप खरे पर्यंतचे कवी असो. मराठीची समृद्ध दालनं आमच्यासमोर पूर्वीपासूनच स्वागतासाठी हजर ठेवली गेली. पण ही दैदीप्यमान परंपरा आम्ही विसरतोय हे ही मृगजळी सत्यच आहे.
तसं पाहिलं तर भाषा हे ‘व्यक्त’ होण्याचे ‘माध्यम’ आहे. अंतरातले उलगडण्याचे,सांगण्याचे साधन आहे. ‘शब्द एक पुरे’ म्हणत समोरच्याला आपला करण्याची कला किंवा निःशब्द नजरेची , कृतीची, पेहरावाची, हसण्याची, रुसण्याची, असण्याची सुध्दा भाषा असते. प्रत्येक भाषेची मर्यादा वा आकाश वेगळे असले तरी,ध्येय मात्र एकच ‘व्यक्त होणे’.
“हे विश्वाचि माझे घर’ म्हणत तुकारामांनी स्वतः सहित, मराठी माणसाला वैश्विकता सांगितली. पण भाषा किंवा माणूस जागतिक होऊन चालत नाही. आपली मानसिकता’ जागतिक झाली पाहिजे, त्यासाठीचे माध्यम आहे भाषा. परकीय प्रदेशात आपलेपणा शोधत राहण्याची सवय प्रत्येकाची. गावाकडची, आपल्या भाषेचा, मातीचा या उपाध्या लावून आपण त्यांना शोधत राहतो. मग भाषिक एकात्मता, प्रांतरचना, राज्य, भाषिक प्रदेश या गोष्टींचे स्त्रोम माजू लागते. पण सर्वजण एक भाषिक असतील तर….. प्रश्न निर्माण होण्याचे थांबतील? की निर्माण झालेले सुटतील?
भाषा व्यक्तीला जोडण्याचे काम करते. ते विशिष्ट मर्यादेत नाही तर वैश्विकतेच्या कक्षेत. ‘आई मला भूक लागली’ हे दोन तीन महिन्याचे चिमुरडे जगातल्या कोणत्याही कानाकोपर्यात एकाच पद्धतीने सांगेल. खूप आनंद झाला यासाठी कोणतेही शब्द वापरावे लागले तरी, डोळ्यातील एक छटा सुद्धा पुरे. तसे नसते तर… काच्या बदाम, पुष्पा मधील सामी सामी ही गाणी आपण ऐकलीच नसती. ( ज्यांनी ऐकली त्यांच्यासाठी )
भाषेने आपण एकत्र आलो, राहिलो, जोडलो गेलो पण तटस्थपणे.ही तटस्थता कायमची चिकटली. शब्दांच्या मुलायमतेच्या अस्तराखाली आपण खेळवत राहिलो अक्षरांना आणि अस्तरांना. त्यातून शब्दांची नितळ वस्त्रे तयारच झाली नाहीत. हा मुलायमतेचा बुरखा फाडून टाकला पाहिजे. त्याची लक्तरे झटकली पाहिजेत. तरच भाषा तटस्थतेची ललाटरेषा पुसट करेल आणि वैश्विकतेची भावना रुजवेल. कारण या विश्वाला गरज आहे वैश्विक मानसिकतेची, त्याचे माध्यम भाषा असावी हे निमित्त! म्हणून भाषा वापरावी अन्यायाविरुद्ध,शोषणाविरुद्ध, समतेसाठी. भाषा वापरावी जगण्यासाठी, जागण्यासाठी अन् आनंदाच्या गाण्यासाठी, अस्तित्वासाठी आणि सत्वासाठी सुद्धा… तरच मराठीचे मराठीपण वैश्विक होईल.
” शब्दांनी पूजा करीत नाही,
मी माणसांसाठी आरती गातो,
ज्यांच्या गावात सूर्य नाही,
त्यांच्या हाती उजेड देतो.”*
हे मराठीचे सामर्थ्य प्रत्येकाच्या ओठी नांदावे व वैश्विकतेचे झाड अंतरी रुजावे…… याचसाठी हा ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित ‘ अट्टहास…!
-प्रा. देवानंद प्रदिप साळवे
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर.
7028999292