काना, मात्रा,ऊकार वेलांटीचा साज शृंगारासह वस्त्र नेसलेली सर्वांगसुंदर माझी माय- माझी मातृभाषा- माझी मराठी- मातृभाषेला वंदन करून आणि ज्यांनी या मराठीची काया घडवली असे ज्ञानपीठ प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषेचा गौरवदिन म्हणून साजरा करतो. या दिनाच्या निमित्ताने मराठीचा सन्मान करायला मिळणे ही आपल्यासाठी एक पर्वणीच आहे.
कुसुमाग्रजांच्या साहित्याने मराठी भाषेला जणू अलंकारच परिधान केले. ‘नटसम्राट सारख्या अलौकिक नाटकातून त्यांची प्रतिभा वाचकांसमोर येते. तसेच ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह तर मराठी भाषेचे भूषण म्हणावे लागेल. त्यांच्या अनेक कवितांपैकी एक. ओळखलंत का सर मला! पावसात आला कोणी। यांसारख्या शेकडो कविता रसिकांचा मनावर आज ही अधिराज्य करतात.
दादासाहेब फाळके, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांच्यासाठी अनेक रत्ने घडली ती या मराठी मातीतच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला बळ दिले ते. मराठीनेच,पु ल देशपांडे ते बहिणाबाई यांसारख्या साहित्यिकांना तृप्त केले ते मराठीनेच.
मग तरीही आपल्याला तिची लाज वाटावी ! यासारखी दुसरी शोकांतिका असूच शकत नाही, जिने आपल्याला घडवले तिला पायदळी तुडवणे हा कृतघ्नपणाच ! आज आपण गौरव दिन साजरा ती टिकावी तिची किंमत वाढावी यासाठी करतोय पण कोणते प्रयत्न करतोय याचा विचार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे जतन करणे हे काम सरकारचे नाही किंवा कोणा राजकीय पक्षाचे नाही तर ते तुम्ही आम्हां सर्वांचे आहे.
उच्चशिक्षित होऊन, ग्लोबल होऊन इंग्रजीसारख्या इतर भाषा अवगत करून मराठी माणूस आपल्या मराठीला विसरत चालला आहे, मान्य आहे की जागतिकिकरणाच्या स्पर्धेत उतरत आहात पण मग आपल्या मातृभाषेला जिने आपला जन्म झाल्यावर पहिला शब्द बोलायला शिकवले तिला विसरून कसे चालेल.
ज्ञानाचा अथांग सागर असलेली मराठी ही भडकली तर तोफ आहे आणि फेकली तर गोफ आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करत मराठीची कास धरायला हवी.
ज्ञानेश्वरांनी लिहिली ती ज्ञानेश्वरी ती भाषा मराठी,तुकारामांनी रचली गाथा ती भाषा मराठी |
शिवरायांनी टिकवली संस्कृती ती भाषा मराठी अन् समृद्ध- संपन्न झाली माझी मायबोली मराठी …..!!
कुसुमाग्रजांना त्यांच्या साहित्यासाठ साहित्य अकादमी, ज्ञानपीठ तसेच पद्मभूषण सारखे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त झाले. स्वातंत्र्याचा संदेश घेऊन गुलामगिरीच्या विरोधातील त्यांचे शब्द आणि तरूण- तरूणी, पुरूष- स्त्रियांमध्ये लोकप्रिय झाले.
कालांतराने भारतीय चिरस्थायी वारसा बनले.
मराठीच्या संवर्धनासाठी शेवटी मराठीचा वारसा पुढे चालवू गडे । मराठी पाऊल पड़त पुढे । मराठी पाऊल पडते पुढे ।…..
मराठी दिनाच्या शुभेच्छा…..!!!!
लेखन:- शिल्पा अविनाश जाधव, अकलूज.