माळीनगर (प्रतिनिधी )-अल्पसंख्यांक समाजातील नववी ते बारावीत शिकणाऱ्या मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनाकडून यंदा प्रथमच एनएसपी पोर्टलवर राबविण्यात येत आहे. नववी-दहावी मधील मुलींसाठी पाच हजार रुपये तर अकरावी-बारावी साठी दहा हजार रुपयांची ही शिष्यवृत्ती योजना असून राज्याच्या अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडून चालू शैक्षणिक वर्षात यंदा प्रथमच या योजनेची कार्यवाही करण्यात येत आहे.
या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे नोडल ऑफिसर म्हणून पुणे येथील राज्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनास २४जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला होता, त्यास अनुसरून राज्य शासनाने २१ फेब्रुवारी रोजी नोडल अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.
शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधून इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील (मुस्लिम ,ख्रिश्चन, बौद्ध,शीख ,पारशी व जैन) फक्त मुलींना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. मागील वर्षी पर्यंत शाळेकडून थेट केंद्र शासनास अर्ज सादर केले जात होते. यंदा प्रथमच ही योजना एन एस पी पोर्टल वर लॉन्च करण्यात आली. पडताळणीसाठी शाळा स्तर व जिल्हास्तर असे दोन टप्पे ठेवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश: अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील आर्थिक कारणांमुळे शिक्षण पूर्ण करू न शकणार्या विद्यार्थिनींसाठी सदर योजना सुरू केलेली आहे. शाळा/ कॉलेज फी ,पुस्तके खरेदी, शालेय उपयोगी साहित्य खरेदी करणे यासाठी या शिष्यवृत्तीची मदत होईल.
सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थिनीं धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील असाव्यात, मागील वर्षीच्या इयत्तेत 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांनींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. अशा या योजनेच्या अटी आहेत.
शिष्यवृत्ती साठी आवश्यक कागदपत्रे- सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी.
शिष्यवृत्ती रक्कम-. इयत्ता ९वी व १०वी साठी ५०००/- रुपये, इयत्ता ११वी व १२ वी साठी ६०००/- रुपये. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थीस प्रत्येक वर्षी नवीन (फ्रेश) अर्ज भरावा लागेल. अर्जाचे नूतनीकरण करण्याची सुविधा नाही. राज्याच्या धर्मनिहाय कोट्यानुसार विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.
सन २०२१-२२ मध्ये बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती साठी महाराष्ट्र राज्य मधून एकूण ४८,५५५ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी सर्व जिल्ह्यातून ४५,५४० अर्जांची पडताळणी झाली आहे. योजनेतील अटी पुर्तता न करणारे, अपूर्ण स्वरूपातील तसेच कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने उर्वरित सर्व अर्ज डिफेक्ट किंवा रिजेक्ट करण्यात आले आहेत. अशी माहिती उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.
“अर्ज पडताळणी करण्याच्या शेवटच्या टप्प्यात या योजनेची कार्यवाही संचालनालयाकडे सोपवण्यात आली. तरीही सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पडताळणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून निवड झालेल्या विद्यार्थीनींना थेट त्यांच्या बँक खात्यावर लवकरच शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येईल”.
दिनकर पाटील, संचालक अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य.