माळीनगर(प्रतिनिधी)-मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तमाम रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक दादा कोंडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अकलूज येथे मोठ्या उत्साहात झाल्या तिन्ही सांजा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच आनंदमूर्ती मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दादा कोंडके फॅन क्लब अकलूज,रोटरी क्लब अकलूज,भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज, प्रोफेशनल कुरियर अकलूज, आरव्हीआयपी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अकलूज, कलांगण क्लासिकल संगीत मैफिल श्रीपुर,आणि मनोहर एकतपुरे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन अकलुज मधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.मनोहर इनामदार यांचे हस्ते दादा कोंडके यांच्या प्रतिमेचे पूजनाने तर रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष नितीन कुदळे,ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे,डॉ. पांडुरंग नलावडे,कलांगणच्या संचालिका श्रीमती वैशाली मोकाशी-पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी नितीन कुदळे यांनी दादा कोंडके यांच्या पुण्यतिथी निमित्त झाल्या तिन्ही सांजा हा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश स्थानिक तसेच नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध उपलब्ध करून देणे व कोणाच्या मानसिकतेतून श्रोत्यांना ताणतणावमुक्त करणे असे दोन उद्देश असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक करताना दादा कोंडके फॅन क्लबचे कांतीलाल एकतपुरे यांनी दादा कोंडके यांचा जन्म ते मृत्यू तसेच त्यांचा सोंगाड्या ते वाजवू का ? हा प्रवास थोडक्यात विशद केला.
डॉ.मनोहर इनामदार यावेळी म्हणाले,पैशापेक्षा माणसं दादांनी जपली असे सांगत अनेक अडथळ्यातून त्यांनी रौप्यमहोत्सवी चित्रपट समाजाला देऊन मनोरंजन आणि समाज प्रबोधन अशी दुहेरी भूमिका त्यांनी साकारली व ही भूमिका चिरंतन सर्वांच्या लक्षात राहील असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संगीतमय सुरुवात कलांगण संगीत मैफिल श्रीपुर यांच्या सुंदर अशा गाण्याने झाली.ऋतुजा सदाफुले या लावण्यवतीने बहारदार लावण्या सादर करत दादांना आदरांजली वाहिली.
यावेळी डॉ.प्रेमनाथ रामदासी,समाधान देशमुख, शब्बीर शेख,जयंत बोबडे, रियाज चौधरी,प्रथमेश उरवणे, औदुंबर भोसले,वीरेंद्र पत्की,डॉ.पांडुरंग नलवडे यांनी कविता सादर करून कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त करून दिली.मारुती जाधव व विवेकानंद गमे पाटील यांनी नकला सादर करून दादा कोंडके यांचा आवाज पुन्हा रसिकांना ऐकण्याचे भाग्य प्राप्त करून दिले.सुनील कांबळे यांनी अंजनीच्या सुता हे दादांचं आजरामर गीत सादर करून त्यांना आदरांजली वाहिली. संगीतकार बाळासाहेब माने पुणे यांच्या मेंडोलिन वरील बनारसी शालू या गीताने रसिकांचे मन मोहून टाकले. कलांगणच्या प्रवीण साठे या युवा बासरी वादकाने तसेच सिद्धनाथ जावीर या तबला पटूने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमाचे प्रसिद्ध व्याख्याते सुहास उरवणे यांनी ओघवत्या शैलीत आणि सुंदर अशा शब्द सुमनांनी सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रायोजक रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष नितीन कुदळे,भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आकलूजचे प्राचार्य गजानन जवंजाळ,वैभव आंबेकर, प्रोफेशनल कूरिअरचे अमित पुंज आणि मनोहर एकतपुरे यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.