प्रज्ञा दया पवार यांनी बाबुराव बागुल यांच्यावर गेल्या वर्षी लिहिलेली ही पोस्टः
दलित साहित्याचे पायोनियर असं ज्यांना सार्थ गौरवाने संबोधता येईल त्यांचा अर्थातच ‘बाबुराव बागूल’ यांचा आज स्मृतीदिन आहे.
‘जेव्हा मी जात चोरली होती’, ‘मरण स्वस्त होत आहे’, ‘सूड’ यासारख्या त्यांच्या अजरामर साहित्यकृती मराठीतील अनघड, अपूर्व, पूर्णपणे अ-पारंपारिक असे मैलाचे दगड आहेत.
शिवाय ‘दलित साहित्य: आजचे क्रांतीविज्ञान’ आणि ‘आंबेडकर भारत’ या पुस्तकांनी त्यावेळी सांस्कृतिक -राजकीय चर्चेची एक वेगळी दिशा विकसित करण्याचा गंभीर प्रयत्न केला होता.
व्यक्तिश: त्यांचा माझा परिचय होता असं म्हणणं काहीसं तोकडं होईल. त्या लहानग्या कोवळ्या वयात त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली माणसाचा खोलवर असा अमिट ठसा उमटला माझ्यावर. काळ्याभोर तुकतुकीत वर्णाचे – देखण्या व्यक्तिमत्वाचे आबा असं काही निर्व्याज हसायचे, की, त्या वयात मला कमालीचं आश्चर्य वाटत राह्यचं. इतके नि:संग, मिडीयाॅकरपणाचा लवलेश नसलेले आबा सर्वात उठून दिसायचे. त्यांना दलित साहित्याचे ‘मॅक्झिम गॉर्की’ म्हणत असत सगळे जण. काही काही माणसांची आभा कितीही काळ उलटला तरी किंचितही कमी होत नाही. उलट काळागणिक त्यांनी केलेल्या कामाची नवनवी डायमेन्शनस् जाणवत राहतात आणि त्यांचं महत्व अधिकाधिक उजळून निघतं.
त्यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन !
वेदा आधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हंटले
आणि सूर्य सूर्य झाला,
तूच चंद्राला चंद्र म्हटले
आणि चंद्र चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तूच केलेस
अन प्रत्येकाने ते मान्य केले
हे प्रतिभावन माणसा
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच सुंदर, सजीव
झाली ही मही !
— बाबुराव बागूल