अकलूज (युगारंभ )-अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे वाफेगाव या ठिकाणी दिनांक २० मार्च २०२२ ते २६ मार्च २०२२ या कालावधीत संपन्न झाले.या शिबिराच्या समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.व समाजकार्यात सहभागी होत असताना कोणतेही काम हे जीव ओतून केले तर ते काम पूर्णत्वास जाते असे सांगितले. त्यासाठी तरुण पिढीने गावातील आणि समाजातील समस्या ओळखून त्याची जाणीव ठेवून काम करावे,तरच खऱ्या अर्थाने गावाचा व देशाचा विकास होईल.तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाचा सकारात्मक दृष्टीने वापर करून त्याचा वापर आपल्या उन्नतीसाठी करावा असे सांगितले.
तर अध्यक्षीय भाषणात डॉ.दत्तात्रय बागडे यांनी महाविद्यालयाच्या वेगळ्या विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचा आढावा घेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांची जाणीव होते व त्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक गावातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक चळवळी निर्माण होत असल्याचे सांगितले.
या शिबिरामध्ये योगा प्रशिक्षण,स्वच्छता अभियान,मंदिर स्वच्छता,स्मशानभूमी स्वच्छता,रस्ते निर्मिती,वृक्षारोपण,प्राचीन संस्कृती जपण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन,मोफत आरोग्य शिबीर,शोषखड्डे,बौद्धिक व्याख्याने, भारुड सादरीकरण,पथनाट्याचे सादरीकरण,प्रभात फेरी इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सी.बी.लोंढे,प्रा.दादासाहेब कोकाटे,डॉ.सविता सातपुते, कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे मौजे वाफेगाव मधील सर्व ग्रामस्थ,जि.प.प्रा.शाळा वाफेगाव मधील सर्व शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सी.बी.लोंढे यांनी केले. सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचा माजी स्वयंसेवक नागनाथ साळवे यांनी केले तर आभार कु.प्रिया भाकरे हिने मानले.
संपूर्ण शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील,महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे -पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक,राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.