श्रीपूर (युगारंभ )-श्रीपूर मध्ये गेली एकेचाळीस वर्षे पूर्ण केलेली जगदिश पाणपोई चे आज सकाळी अकरा वाजता किरण संतराम सराटे प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया सांगली यांचे शुभहस्ते करण्यात आले.
श्रीपूर परिसरात आगाशे परिवाराचे साखर कारखान्याचे माध्यमातून मोठे योगदान आहे. तसेच जगदीश आगाशे साहेब यांचे विशेष सहकार्य येथील शेतकरी कामगार संघटना यांना सामाजिक विधायक सांस्कृतिक कार्यासाठी सहकार्य असायचे. त्यांनी पंडित साहेब म्हणून सर्वत्र ओळखले जायचे.अशा लोकसहभाग संपर्क,तसेच गोरगरीबांविषयी आस्था असलेल्या पंडितराव आगाशे साहेब यांचे अकाली निधन झाले.त्यांची आठवण,त्यांचेवर निष्ठा, आदर, प्रेम असलेले अल्लाबक्ष शेख यांनी स्वखर्चाने दरवर्षी गुढी पाडवा झाला की जगदिश पाणपोई सुरू करतात.
चैत्र महिन्यात यात्रा उत्सव सुरु असतात. शिखर शिंगणापूर यात्रेला या भागातून शंभू महादेव यांची कावड खांद्यावर घेतलेले शेंकडों भाविक या रस्त्यावरून जात असतात. तसेच महाळुंग येथील ग्रामदैवत यमाई देवीची चैत्र महिन्यात अष्टमीला यात्रा भरते.पुर्व भागांतून यात्रेला जाणारे भाविकांना या पाणपोईचा लाभ होतो. विशेष म्हणजे गेल्या चार पाच वर्षांपासून आरोचे पाणी असलेले जार ठेवले जातात. या पुर्वी मोठे -डेरे ठेवले जायचे. पाणी भरण्यासाठी शेख यांचेकडून एक पगारी मजूर ठेवला जायचा.आता जार मधील पाणी ग्लास मध्ये देण्यासाठी एक मजूर ठेवला आहे.
अल्लाबक्ष शेख यांचे वडील हे एक्साईज खात्यात पोलिस हवालदार होते. ते दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि श्रीपूर येथे एक्साईज खात्यात कामावर होते.त्यांना नऊ मुलं व एक मुलगी होती. एवढं मोठं कुटुंब शेख संभाळत. त्यावेळी तुटपुंज्या पगारात एक्साईज खात्यात नोकरी करून अत्यंत प्रामाणिक नोकरी करुन त्यांनी मुलांना शिक्षण दिले. ते निर्व्यसनी होते. कोणतेही काम उद्योग धंदा प्रामाणिक करावा अशी त्यांची शिकवण होती.विशेष म्हणजे एक्साईज खात्यात नोकरीला होते,तरी प्रामाणिक पणाने त्यांनी बाहेर खाजगी पार्ट टाइम काम केली. सर्व मुलांना स्वतःचे पायांवर उभं केलं. तुम्ही शिका धंदा व्यवसाय करा, तुम्हाला काम लावावं म्हणून मी कोणापुढे हात पसरणार नाही,मी वशिला लावणारं नाही.असं त्यांनी मुलांना स्पष्ट सांगितले होते.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या एकाही मुलाला कंपनीत कामांवर घ्या म्हणून आगाशे यांचेकडे मागणी केली नाही. त्यामुळे आगाशे यांच्या कंपनीत त्यांच्या नंतर शेख कुटुंबातील कोणीही नोकरी मागितली नाही.ते सर्व स्वतःचे पायांवर उभे राहिले.
मात्र आगाशे कुटुंबांवर निष्ठा आदर असल्यामुळे पंडित साहेब यांच्या स्मरणार्थ अल्लाबक्ष शेख यांनी चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेली ही पाणपोई अव्याहत चालू आहे. दरवर्षी आषाढी वारी ला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्यातील वारकरयांना मिष्ठान्न भोजन शेख परिवाराचे वतीने दिले जाते.
जाती धर्माच्या भिंती तोडून इथं फक्त मानवता सामाजिक सलोखा बंधुभाव जोपासणारे शेख कुटुंब माळशिरस तालुक्यातील एक सामाजिक प्रतिष्ठा जोपासणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते