इंदापूर(युगारंभ )-सराटी ता. इंदापूर येथे दि. 5 एप्रिल ते 11 एप्रिल पर्यंत श्रीराम जन्मोत्सव प्रित्यर्थ भगवान श्रीराम मंदिर पंचवटी कुरळे वस्ती याठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे हे 33 वे वर्ष असून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाचे कुरळे परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात येते.
यानिमित्त अभिजित महाराज कुरळे,लक्ष्मण महाराज कोकाटे, श्रीराम महाराज अभंग,राहूल महाराज चोरमले,मंगेश महाराज देशमुख,स्वामीराज भिसे आदीची सुश्राव्य किर्तन सेवा होणार असून दिनांक 10 रोजी सायंकाळी दीपोत्सव आणि श्रीरामजन्माचे फुलाचे किर्तन अजित महाराज कुरळे यांचे होणार असून दि 11 रोजी नवनाथ महाराज मारकड यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह चे व्यासपीठ चालक शत्रुघ्न महाराज जगदाळे हे पाहणार असून पहाटे काकडा आरती,श्रीरामाभिषेक विष्णूसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजन, गाथा भजन, हरिपाठ,प्रवचन, किर्तन , हरिजागर असा नित्यक्रम असल्याचे आयोजक अजित महाराज कुरळे सर, अभिजित महाराज कुरळे सर, ऋषीकेश कुरळे यांनी सांगितले.
दरवर्षी या सप्ताहात गरजूंना मदत करून, गरिबांची लग्न लावून सामाजिक काम केले जाते तसेच आदर्श माता पुरस्कार देवून मातांचा सन्मान केला जातो यावर्षी भारूड सम्राट लक्ष्मण महाराज राजगुरू आणि डाॅ लक्ष्मण आसबे यांचे हस्ते 14 आदर्श माता आणि 2 यशवंत युवा सन्मान दिले जाणार आहेत.
भगवानराव कुरळे यांनी 1990 साली सुरू केलेली ही परंपरा अखंडपणे चालू असल्याने श्रीराम नवमी निमित्त पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील लोक दरवर्षी आपली उपस्थिती दाखवत या उत्सवात सहभागी होतात.