मुंबई (युगारंभ )-रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नितीन गडकरी यांनी शिवतीर्थवर दाखल होऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. तब्बल दोन तास त्यांची भेट झाली असल्याचे सांगितले जात आहे.
या भेटीदरम्यान भाजपा-मनसे युतीबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. पण या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांनी या भेटीमागचे कारण सांगितले. राज ठाकरेंच्या घराबाहेर पडल्यानंतर नितीन गडकरी यांनी सांगितले की, ‘माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावले होते. म्हणून मी आलो.’, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरींनी पुढे सांगितले की,
‘परवा हृदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला त्यावेळी राज यांनी म्हटलं होतं एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाहीय. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि कौटुंबिक होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही.’
त्यामुळे नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीनंतर भाजपा-मनसे युतीबाबत जी चर्चा होत आहे त्यावर पूर्णविराम दिले आहे. ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.