लालपरी / एस टी
भर उन्हात, पावसात अथवा थंडीत कोणत्याही परिस्थितीत खडखड वाजत गावात प्रवेश करायची.तिच्या वाटेकडं लोकं डोळे लावून बसायचे. अशी ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी वाहिनी म्हणजेच एस.टी. बस आज दुर्मीळ झाली आहे.
लांबून पहिले तर फक्त एक डबा दिसावा अन् तिच्या डौलदार चालीने, खिडक्यांच्या काचांच्या खळखळाटाने सगळ्याचे लक्ष वेधणारीने लालपरीने कित्येक दिवस दर्शन न दिल्याने गावातील चौकात रेंगाळणाऱ्या लोकांना गावकऱ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलंय.
ग्रामीण जीवनातील लोकांचे दळणवळणाचा अविभाज्य साधन म्हणजे एस.टी. बस. हिचा लाल भडक रंग डेंजर नाही तर समाधान वाटणारा त्यामुळेच ती सर्वांना हवीशी वाटायची. लांबून तिला पाहताच सार गावं आनंदून जाणारं हे ठरलेलं गणित.
तिच्या वेळांवर गावातील लोकांचे वेळापत्रक चालायचे पण ते घड्याळ आता बंद पडते की काय असं वाटायला लागलय.
आजही एखादया खेड्याला जाणारी एस.टी. तिथल्या लोकांचा आपुलकीचा विषय असतो. जर गावात दिवसातून दोन तीन वेळेस जर एस टी येत असेल तर तिचे अप्रूप निराळेच असते. आपल्या गावाला एस टी हवी असे सर्वांना वाटत असते.
कुणाच्या घरी पाव्हणा आला. कोण कुठल्या गावाला चालला.कुठली गाडी कितीला येणारं हे सगळं गावातल्या स्टॅन्डवर बघायला मिळणार.शाळेतली पोरं, कॉलेजात जाणारी पोरं -पोरी, शहरात नोकरी करणारे तालुक्याच्या गावाला जाणारे वयोवृद्ध अथवा बाजाराला जाणारी माणसं, बाया- बापड्या,शेतकरी, शेतमजूर यांची हक्काची चर्चा करण्याची जागा असते ती एस.टी. दुधाच्या किटल्या,भाज्यांची पोती,फळाची कॅरेट,आणि अशा अनेक वस्तु शहरात घेऊन जाणारा शेतकरी एस टी लाच प्राधान्य देतो.
सुट्टीला मामाच्या गावाला जाणारी असूदेत नाहीतर, नवी नवरी माहेरी जाणारी या सगळ्यांना प्रवासाची गोडी एस टी बसने येते.
सासरी आलेल्या नव्या नवरीला एकमेव अधिकाराची माहेरची गोष्ट म्हणजे ही लालपरी, तिला पाहिलं की माझ्यासाठी माहेराचा निरोप घेऊन आली की काय असं त्यासासुरवाशीनीला वाटू लागतं..
एखादया वेळी वेळेपेक्षा यायला उशीर झाला तर प्रवाश्याच्या मनातून राग आणणारी आणि गर्दीच्या वेळी जागा बसायला मिळते कि नाही म्हणून खिडकीतून रुमाल, टोपी, पिशवी टाकून हक्काची जागा धरायचीही सोय फक्त एसटीत असते.
बाजाराच्या दिवशी खचाखच भरून, अनेक ओझी गाडीत घेऊन, गाडीवर पेलून आनंदात आपल्या घरापर्यंत गावागावांत,वाड्या वस्त्यावर पोहचवणारी फक्त एसटी असते.
हजारो लोकांच्या स्वभावाचे दर्शन घेणारी, कुणाच्या प्रेमाची साक्षीदार, कुणाच्या लग्ना जुळवण्याचे, ओळखी घडवून आणणारी, कुणाचे भांडण तंटे वाढवणारी अथवा मिटवणारी ही एकमेव साक्षीदार एसटी असते.
तिच्या खडखड आवाजापेक्षा माणसांचे मोठ्या आवाजात बोलणे तालबद्ध वाटू लागते कधी त्यात कुणाच कौतुक ऐकायला मिळत तर कधी शिव्या ऐकायला मिळतात तो अनुभव फक्त लालपरीतच मिळतो.
काळ बदलला मात्र ही बया अजून तशीच राहीली. माणसं मात्र बदलत गेली बदललेल्या माणसांनी न बदलेल्या एस टी कडे पाहण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही
परंतु संप, मोर्चे, बंद यांना तोडफोड, जाळपोळ करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे लालपरी एवढं दुःख सहन करून ही दिमाखात माझ्य गावाकडच्या लोकांची रक्तवाहीना म्हणून फिरत राहिली भिंगरी सारखी गर गर गर गर…..
पण काही महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अनेकांच्या जीवावर बेतला आहे. एसटीचे कर्मचारी प्रत्येक वेळी आपल्या नातेवाईकासारखे वाटायचे. गावात एखाद्या ड्रायव्हर- कंडक्टर जोड नेहमी मुक्कामी येत असते तेव्हा त्यांची लोकं आतुरतेने वाट बघत त्यांची आपुलकीने विचारपूस करत.
शाळेच्या सहली जायच्या झाल्या तर आमची शाळा नेहमीचाच ड्रायव्हर द्या नाहीतर त्यांना वेळ असेल तेव्हाच सहल काढू असे म्हणणे गावकर्यांचे व शिक्षकांचे असे.कारण एखादा ड्रायव्हर किती चांगली गाडी चालवतो सुखरूप आणून पोहचवतो किंवा या चालकाची गाडी चांगली नसते वगैरे चर्चा गावात रंगत असायच्या. आमच्या गावात एकदा एसटी खेड्यात पडली तेव्हा गावकरी बैलगाडीने सगळ्यांना दवाखान्यात घेवून गेले. एवढं घट्ट नातं असायचं एसटीच्या कर्मचार्यांच आणि गावकर्यांच.
काळ बदलला वाहतुकीची साधन वाढली नवीन गाड्या लोकांच्या हातात आल्या आणि भुर्रकन लोकं शहरात जाऊ लागली त्यांमुळे मी एस टी शिवाय प्रवास करत नाही म्हणणारे लोकं आता मी कित्येक दिवस एसटीने कुठे गेलोच नाही असं अभिमानाने सांगतात. त्याच बदलामुळे एसटीची, त्यांच्या कर्मचार्यांची आणि गावांची त्यांच्याशी नाळ तुटली आहे नाही तर मागील वीस वर्षापूर्वी हा संप झाला असता तर सगळी गावच्या गावं एसटी साठी रस्तावर उतरताना दिसली असती.माणसांचा स्वभाव माझी गरज संपली की झालं दुसर्याच देणंघेणं नाही.दिवस रात्र लोकांसाठी प्रवास करून मिळेल ते खायचं आडरानात मुक्कामी गेलं तरी तिथे राहायचं दोन तीन दिवस घरच्यांच तोंड पाहायचं नाही एवढं करून पगार वाढ आणि शासकीय नियमाप्रमाणे नोकरी करण्याची इच्छा केली तर बिघडले कुठे.
शहरातील विविध भागात जाण्यासाठी विविध वाहने आहेत.परंतु ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवर दरी खोर्यातून वाट काढत जाणारी फक्त एसटी आहे. आणि तिथली आजारी,म्हातारी माणसं, बाळंतीण महिला यांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे खाजगी वाहन चालक त्यांना लुबाडताना दिसत आहेत. त्यामुळेच एस टीची गरज आहे.शासनाने कितीही मेट्रोच्या मोठ मोठ्या गप्पा मारल्या तरी ग्रामीण भागात एसटी शिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचा वाहतुकीचा कणा मोडखळीस आणून राज्याचा विकास साधता येणार नाही हे मात्र तितकेच खरे.