1990 नंतरचा काळ क्रिकेटच्या नव्या बदलाचा काळ होता.गावाकडच्या खेड्यात, वस्तीवर रानात राहणार्या सगळ्या पोरांना वेड लावलं होतं त्याच कारण पत्र्याच्या, पाचूटाच्या झोपडीत झालेलं टिव्ही आणि लाईटच आगमन.
आमच्या गावात मैदान नावाची गोष्ट नव्हती. पण जिकडे नजर जाईल तिकड ऊसाची काळभोर सपाट रान.
वस्तीच्या जवळ असलेल्या एखाद्याच्या रानातलं पिक काढून नागंरट केली की लगेच ढेकळ फोडून त्या भागावर डल्ला मारून सुरपाटाच मैदान आखलं जायचंय शाळा संध्याकाळी पाचला सुटायची घरी आलं की दप्तराच्या पिशव्या फेकायच्या अन अंधार पडूस्तर खेळायचं. तोपर्यंत आई-बाप शेतातली काम संपवून घराकडं जनावरांसाठी गवताची वझी , वाड्याच्या पेंढ्या घेऊन येताना पोरांना खेळताना बघायची आणि आपापल्या पोराला शिव्या झाडतच घराकडं घिऊन जायची.तेव्हाच खरा खेळ संपायचा आणि प्रत्येक बाप लेकाचा ,आई-पोराचा खेळावरून झालेला तमाशा बघायला मजा यायची ती वेगळीच.
घरी गेल्यावर मग कुणी गाई, म्हशीच शाणघाण, लोटून झाडून घिऊन, पेंढ चारून दूध काढून डेअरीला दूध घालून येऊन भाकरी खावून होईपर्यंत वस्तीवरच्या लक्ष्मीआईच्या मंदिराजवळ बापू मांगाची हलगी वाजायची की सगळी पोरं तिकडं धावायची मग मध्यरात्री पर्यंत लेझमाचे डाव रंगायचे. जुनी जाणती माणसं नव्या पोरांना लेझमाचे डाव शिकवायची.
बारकी पोरं हालगी गरम करायला पाचूट गोळा करून आणायची. सारखी शेकोटी पेटवायची आन त्यावर बापू आपली हालगी शेकत असे आणि पुन्हा दुसर्या डावाला सुरवात.वस्तीवर कुणाच लग्न असलं की वरातीला लेझमाच्या घायवर नाचण्याची प्रथा होती. रात्रभर अशा वराती रंगायच्या की सगळ्याच गावातल्या बायका पोरं बघायला यायची.
गावातली शाळा संपली पोरं शेजारच्या गावात फॅक्टरीच्या शाळेत जायला लागली पुढं टिव्हीनं क्रिकेट घराघरात पोहोचल मग सुरपाटाची जागा क्रिकेटन घेतली.जिथ सुरपाटाच मैदान व्हायचं तिथ क्रिकेटच मैदान होऊ लागलं
मग कुणी बॅट साठी लाकडाच्या फळ्या चोरून आणू लागलं. स्टंप म्हणून लिंबाच्या, बाभळीच्या झाडाच्या फांदीच्या काठ्याचा वापर झाला.आता बाॅल आणायला दोन रूपये गोळा करणं मुश्किल व्हायचं पण त्यावेळी रबराचे बाॅल लवकर फुटायचे म्हणून प्लॅस्टीकचे बाॅल वापराची सवय लागली त्यावर पेप्सी, किटकॅट असं लिहिलेलं असायचं आणि टिकायला चांगले होते पुढं जाऊन प्लॅस्टिक बाॅल मध्ये पेप्सीची बाॅल चांगला असा एकंदर संशोधन पोरांचं झालं आणि तोच बाॅल वापरायला अधिकृत मान्यताच मिळाली.
गावातल्या पोरांसोबत मॅच असली की पोरं पेप्सीच्या बाॅलचा हट्ट धरायची.काहीजण म्हणायची तो आपल्यासाठी लकी आहे किंवा काहींना वाटायच सचिन कसा एम आर एफ ची बॅट वापरतो आणि चांगला खेळतो तसं पेप्सीचा बाॅल असल्याशिवाय आपल्याला खेळायलाच येत नाही असं लाॅजिक त्यांच.
दररोज खेळ संपला की रात्री मैदानाची काळजी वाटत त्याच कारण शेजारच्या बायका आपल्या लहान लहान पोरांना मैदानात हागायला बसवत.मग दुसर्यादिवशी तोच राडा अनेकदा काढून पोरं वैतागून जात पण खेळ बंद होऊ नये म्हणून हे चालूच राहायचं. पोरं स्वतःला राहूल, सौरभ, सचिन, सेहवाग असे समजू लागले होती. काहीजणांनी नवीन शोध लावला की हाताच्या कोपराला तेल लावले की बॅटींग चांगली येते आणि मनगटाला तेल लावले की बाॅलिंग मग काय घरात चोरून तेल लावून पैलवान खेळायला येतं.
पुढे प्लॅस्टिक बाॅल क्रिकेट स्पर्धा होऊ लागल्या शेजारच्या गावातल्या पोरांची आणि वस्तीवरच्या, रानातल्या पोरांची अशा टिम करून खेळ रंगू लागले. पंचक्रोशीत प्लॅस्टिक बाॅल स्पर्धा भरू लागल्या तिथे पाच- दहा रूपये प्रवेश फि एकमेकांकडून गोळा करून भरून खेळायला जायचं आणि खेळून यायचं पण फायनल मात्र आयोजकाची टिम मारायची.पण एखादी मॅच जिंकली की पैसे वसूल आनंद वाटायचा.
सुरपाट,गोट्या, सुरपारंब्या, तारं पासून बनवलेली चाकाची गाडी, टायरची चक्र, चिखलाचे ट्रॅक्टरचे खेळ खेळत कधी मोठे झालो हे कळलं नाही पण मोबाईलचा काळ आला नी ते खेळ काळाच्या पडद्याआड गेले आणि ज्यांचं बोट धरून शिकलो ती माणसं आता थकली आहेत तर बरेच जग सोडून गेले आहेत.
क्रमशः…