सध्या ऊन्हाचा कहर वाढला आहे.वाढत्या तापमानामुळे जीवाची होणारी तगमग आणि घामाच्या धारांनी डबडबलेला माणूस फॅन,एसीची हवा आणि झाडांची सावली शोधताना दिसत आहे.तांबवे ता.माळशिरस येथीलऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीची साक्ष देत उभे असणारे वज्रेश्वरी मंदीर गेली अनेक दशके भर उन्हाळ्यातही गारवा देण्याचे काम करीत आहे.
कडक ऊन्हातून आल्यानंतर मंदीरात प्रवेश करताच आपणाला थंडगार गारव्याची अनुभूती येऊ लागते त्यामुळेच आपणाला तिथे बसण्याचा मोह आवरत नाही.ना कोणता फॅन किंवा एसी तरीही येथे गारवा टिकून राहतो.
पुरातन वज्रेश्वरीचे हे मंदीर निरानदीच्या काठावर उंच टेकडीवर पुर्वाभिमुख असून मंदीराचे बांधकाम संपूर्ण काळ्या पाषाणातील हेमाडपंथी शैलीतील आणि तितकेच डौलदार आहे.मंदीरात प्रवेश करताक्षणी अंतरंगातील गोलाकार गाभारा आणि संपूर्ण पाषाणातील तेजस्वी मुर्ती मनाला भावते .
देवीच्या मुर्तीसमोर गोल आकाराचे दगडी ताट असून या ताटात सुवासिनी जेवण्याची पंरपरा रूढ आहे. गाभार्याच्या समोर दगडी खांब आहेत मंदीराच्या समोरच नदीकडे जाण्यासाठी दगडी चिऱ्यांच्या पायऱ्या आहेत. पायऱ्या संपताच दगडी कमान असून त्या कमानीवरील पाच दगड हे पाच पांडवांचे प्रतिक मानले जातात.
कमानीच्या समोरील चौथरा असूरांच्या समाधींचे प्रतिक असल्याची भावना रूढ आहे. सदर मंदीर राक्षसांनी एका रात्रीत बांधले अशा काही अख्यायिका येथे प्रसिद्ध आहेत.मंदीरा समोर दगडी दिपमाळ देखील आहे. मंदिरालगत निरा नदीच्या पात्रात मोठा कुंड आहे त्यास वज्रेश्वरी कुंड असे म्हणतात. नदीपात्रतील कुंडाशेजारी खडकांवर काळ्यारंगाचे ठिपके तसेच दगडावर गाय,हत्ती,मासा,घोडा,उंट अशा प्राण्याच्या पाऊलखुणा लक्ष वेधून घेतात. उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी आटल्यानंतरही कुंडातले पाणी आटत नसल्याचे स्थानिक सांगतात
मंदीराच्या बाहेर नदीकाठाला शंकराची पिंड आणि नंदी आहे. तेथे कौल लावण्याची प्रथा आहे.मंगळवार, शुक्रवारी भाविक दर्शनासाठी येत असतात.व्रजेश्वरी देवीचा उल्लेख रामायण व नवनाथ ग्रंथात येतो तसेच संपूर्ण देशभरात वज्रेश्वरी देवीची दोनच मंदीरे आहेत एक मुंबई जवळ वसई येथे तर दुसरे सोलापूर जिल्ह्यातील तांबवे या ठिकाणी आहे.
वज्रेश्वरी मंदीर हे संपूर्ण दगडी आणि हेमाडपंथी शैलीतील असल्याने तेथे गारवा टिकून राहतो.तसेच संपूर्ण दगडी मंदीरे, पुरातन दगडी वाडे यांमध्ये देखील गारवा टिकून राहतो.
- रवि शिवाजी मोरे, मंगळवेढा
ऐतिहासिक वास्तू अभ्यासक, लेखक
लेखक –
प्रा. गणेश करडे ,
माळीनगर