आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि घरात टिव्ही अन् भरमसाट चॅनेल त्यांमुळे मनोरंजनाचा अतिरेक झालेला दिसतो आहे.
मोबाईल वर कोणतंही अॅप घेतलं की गाणी, डान्स चित्रपट एका मिनिटात ऐकायला मिळतात.त्यामुळे जग जवळ आले पण ज्यावेळी एखादी गोष्ट मिळत नसते त्यावेळी तिच्याकडे कौतुकाने पाहिले जाते.आताच्या काळात डिजे डाॅल्बीला वेडी झालेली पोरं सर्रास मोबाईलवर गाणी लावून फिरताना दिसतील.
पण लग्नात सासर्यानं दिलेला रेडीओ सायकलला लावून रानात जाणारा, म्हशीमागं छांद्यावर रिडीओची गाणी लावून फिरणारा शिवानाना आज पण आठवतो. क्रिकेटची मॅच असली आणि त्यात भारत पाकिस्तान तर बोलायचं कामच नाही एवढी पोरं शिवानानाच्या भोवतीनं बसून तासनतास क्रिकेट ऐकायची, दिवसभर रानात बातम्या, विविधभारतीची गाणी ऐकायची.
किल्लारी भूकंप झाला तेव्हा गावात एक टिव्ही होता तो पण ब्लॅक इन व्हाईट बापू ड्रायव्हरच्या घरी सगळं गाव जमलं हुतं. ते बघायला आणि ढसाढसा रडत हुतं.
नवरात्रात देवी गाणी म्हणजे पर्वणी तर पोरं गणपती बसवू लागल्यावर गावात पहिल्यांदा व्हिसीआर भाड्यानं आणून पहिल्यांदा शिवंवरण वाण्याच्या रानातून लाईट आणून पिक्चर बघितला.
जागरण गोंधळाला जशी रात्रीची लोकं गोधड्या, घोंगडी घेऊन रातभर कार्यक्रम बघायचे तसं सगळ गाव शिवंवर पिक्चर बघायला जमलं.
आता एखादं गाणं रिलीज झालं की लगेच मोबाईल वाजतं पण ट्रॅक्टर ड्रायव्हर आम्हाला हिरो सारखे वाटायचे कारणं कारखाना चालू झाला की गावातली पोरं, ड्रायव्हर लोकं कॅसेटं आणून टेप लावून मोठ्यानं गाणी वाजायची आणि तेव्हा ग्रामीण भागात जसंच्या तसं गाणं रिलीज व्हायचं. मग आवडलेली कॅसेट घ्यायला पोरं आठवड्यात एकदा फॅक्टरीच्या गावात जातं आणि कॅसेट आणून रिळ खराब होईपर्यंत ऐकायची.
टॅक्टर ड्रायव्हर मुळं ग्रामीण भागात अमिताभ, मिथून, अजय देवगण, माधुरी सलमान , अल्ताफ राजा खर्या अर्थानं कळाली नाहीतर चित्रपट गृहात सिनेमा बघायचं म्हणजे गर्दी होणार फक्त दादा कोंडके आणि माहेरची साडी अशा चित्रपटांनाच.बाया ढसाढसा रडायच्या वाटत माहेरची साडी बघताना.
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनी चांगलंच मनोरंजन केलं.
त्यामुळेच पोरं अजय देवगण, तेरेनाम सारखा केसाचा कट मारून हिंडताना दिसतं होती.आता ती तिशीत चाळिशीत गेली.पण गावाकडं गेल्यावर रानात ट्रॅक्टर नांगरत असला आणि एखादं 90 मधलं गाणं लागल की सगुण विसरून ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसावं आणि गाणं ऐकावं असं वाटत कारण कितीही महागडे हेडफोन्स, डिजे डाॅल्बी आले असले तरी त्याच्या ट्रॅक्टरच्या आवाजात गाणी ऐकण्याची मजा काय निराळीच होती……