December 1, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

‘महामार्गाच्या प्रगतीत ; वृक्षवल्ली व्यथित.’- माळीनगर मधून जाणाऱ्या देहू ते पंढरपूर पालखी मार्गामुळे शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल

महामार्गाच्या प्रगतीत ; वृक्षवल्ली व्यथित.’

माळीनगर मधून जाणाऱ्या देहू ते पंढरपूर पालखी मार्गामुळे शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल

माळीनगर/युगारंभ -इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील आनंदाचे झाड हा धडा वाचला काही क्षण मन बालपणातील दिवसात गेलं.. आपल्या आनंदाचं कारण असणारं ,सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं, अनेकांचे बालपण अनुभवलेले, आजोळातील कडूलिंबाच्या झाडाच्या आठवणीत मन रमून गेलं. खर तर ते झाड ‘माझे आवडते झाड’ वगैरे नव्हते पण त्याच्याशी निगडीत अनेक आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या.

   उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचा गाव हे समीकरण अगदी अजूनही दृढ आहे.सुट्टीचे दिवस म्हणजे दिवसभर खेळणे , हुडांरणे, याशिवाय काहीही काम नसते. दुपारच्या उन्हात बाहेर जायला घरचे सगळेच रागवायचे ऊन उतरल्यावर खेळायला जा असं बजावून सांगायचे. मग काय याच झाडाखाली दिवभर बैठे खेळ रंगायचे. ऊसाच्या बैलगाड्या रस्त्यानं कारखान्याकडं जायच्या त्यातून ऊस ओढून काढणे, झाडाच्या सावलीत येवून दगडावर आपटून सगळ्यानी मिळून तो ऊस खाणे, कुल्फीवाला, गारेगार बर्फ गोळ्यावाला, पेप्सी कांडीवाला, असे सगळेच यायचे या सगळ्यांचा अस्वाद घेतला जायचा तो त्याच झाडाच्या सावलीत बसून…

 क्रिकेट, विटी दांडू, गोट्या, सुरपारंब्या , डोंगरपाणी ,गजगे, चल्लस- आठ, पाटीवरची कोडी, चिखलाचे खेळ असे अनेक मातीतले खेळ याच झाडाखाली खेळलो.

      ते कडुलिंबाचे झाड आजोबाने लावलेले होते. त्याच्या भोवती दगडाचा भक्कम पारासारखा कट्टा बांधला होता.त्याच कट्ट्यावर बसून खेळत- खेळत आमचे बालपण गेले, उन्हाळ्यात आजोळी आल्यावर अनेक जेवण त्याच कट्यावर होत होती. जवळच वस्तीवरून गावाला जोडणारा डांबरी रस्ता असल्याने थकलेला वाटसरू त्याच झाडाखाली विसावा घेऊन माठातील गार पाणी पिऊन पुढे जात असे. आजोबा शेतातील काम करणारे असल्याने त्यांची शेतकरी मित्र मंडळीच्या पिका-पाण्याच्या गप्पा त्याच झाडाखालच्या कट्यावर चालायच्या, आजोबांचा पान,चूना, काथ, अडकित्ता ठेवलेला पानपुडा कायम त्याच कट्यावर असायचा. आम्हीपण पानावर कधी कधी ताव मारायचो. आमच्या मामाच्या, मावश्यांच्या लग्नाचा, सुख- दुःखाच्या कार्याचा साक्षीदार ते झाड होतं.

 ओळखीच्या माणसांना सांगायचा पत्ता म्हणजे ते झाड होतं, नवीन पै पाहुण्यांना घराची ओळख सांगायची खूण म्हणजे झाड होते. 

    मोठे झाल्यावर शिक्षणाला बाहेर असताना झाड तोडल्याचे कळाले.रस्त्याच्या रंदीकरणात ते जाणार होते. त्यावेळी खूप वाईट वाटले.सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, बालपण आठवलं पण एखाद्या झाडाशी एवढी आपली मायेची गुंतागुंत असू शकते हे त्यावेळी कळाले. बर्याच दिवसांनंतर तिकडे जाणे झाले त्यावेळी दोन आठवणींनी मन गलबलून आलं एक देवाघरी गेलेल्या आजोबांची आणि त्या कडुलिंबाच्या झाडाची. कडू लिंब चवीला कडू होता पण अनेक आठवणीचा गोडवा देऊन गेला. घराची शोभा या दोंघामुळे होती असे वाटू लागले. 

 माणसं गेल्याचं दुख असतं पंरतु त्याच माणसांच्या आठवणीतील झाडे तोडल्यावर देखील मनाला यातना होतात. 

   आजच्या स्थितीला माळीनगर मधून जाणाऱ्या पालखी महामार्गाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे झाडांच्या कत्तली चालू असताना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. केविलवाणे चेहरे करून उभा राहिलेला माणसं दिसली की वाटते यांच्याही या झाडांशी काहीतरी आठवणी असतील.त्यांना ही दुःख होत असेल.पण खरच ही एवढी अफाट तोडलेली वृक्षसंपदा हे पुन्हा लावू शकतील का कि फक्त फुलांची लहान झाडे लावून सौंदर्याच्या नावाखाली छोट्या झाडांची बोळवण करतील याचे भय वाटू लागते. एवढ्या अफाट तोडलेल्या वक्षांच्या बदल्यात जर झाडे लावली गेली नाहीत तर काय होईल. वृक्षारोपण आपण दरवर्षी करतोयच की वर्षानुवर्ष एकाच खड्ड्यात झाडं लावणं चालूच आहे. प्रत्येकाचा जीव त्याझाडांमध्ये अडकलेला असतो झाडे तोडल्यावर दुख होतं त्याच बदल्यात आपण झाडं लावली पाहिजेत तर पुढच्या पिढीसाठी ते आनंदाच झाड होईल हे मनापासून वाटून गेलं….

-प्रा गणेश करडे, माळीनगर 

Related posts

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

Admin

रविवार विशेष लेख .. ‘लालपरीचं अप्रूप’.-प्रा. गणेश करडे

yugarambh

मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध कवी आणि लेखक नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धो. महानोर यांचं निधन

yugarambh

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करुन देवू- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

yugarambh

माळीनगर शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा राजेंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श सेवा निवृत्त मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान.

yugarambh

‘मराठी भाषा गौरव दिन’ – गझलगान -सुरेश भट

yugarambh

Leave a Comment