अकलूज (युगारंभ):-पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने ७ जूनला विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर समोर हलगीनादसह बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागण्यांमध्ये अकलुज माळेवाडी नगरपरिषद अंतर्गत खराब झालेले रस्ते दुरुस्त करुन काही भागामध्ये नव्याने रस्ते बांधून मिळावेत,अकलुज मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही ते उपलब्ध करून द्यावे, अकलूज माळेवाडी मधील काही गटारी खराब झाल्या असून त्या दुरुस्त करून काही ठिकाणी नवीन गटारी बांधून मिळाव्यात,अकलूज माळेवाडी मधील कचरा बरेच दिवस उचलला जात नाही तो कचरा वेळच्यावेळी उचलून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा,अकलुजमधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र नव्याने शौचालय बांधून मिळावेत, अकलूज माळेवाडी मधील काही भागांमध्ये रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय नसल्याने ती वसाहत अंधारात असते त्यामुळे त्याठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यात यावी,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अकलूज या बँकेच्या मॅनेजरसह इतर कर्मचारी व गार्ड यांचेवर कडक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे,अकलूज परिसर व माळशिरस तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून माळशिरस तालुक्यातील सर्व डांबरी रस्ते त्वरित नव्याने बांधून मिळावेत,अकलूज येथील अकलूज क्रिटिकल केअर ऍण्ड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उच्च अधिकार समितीमार्फत चौकशी करून संबंधित हॉस्पिटलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा,माळशिरस तालुक्यातील महाळुंग व पिलीव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करून त्या ठिकाणी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
या वरील मागण्यांचे निवेदन राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता यांच्यासह संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले होते.सोलापूर येथील ७ जूनच्या आंदोलनानंतरही मागण्या पुर्ण नाही झाल्या तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.