अकलूज (युगारंभ )-राजकारण्यांच्या घोडेबाजारात एका दलित चळवळीतील कणखर नेतृत्वाचा विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा समस्त दलितांच्या जिव्हारी लागलेला आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली,संधी दिली याबाबत काँग्रेसचे दलित चळवळीतून आभार व्यक्त होत असले तरी सामाजिक न्याय विभागाला एक नवा आयाम प्राप्त करून देणारे चंद्रकांत हांडोरे यांचा झालेला पराभव मनाला चटका लावणारा ठरला आहे.
माननीय चंद्रकांत हंडोरे यांनी समाज कल्याण खात्याला नवीन उजाळा प्राप्त करून दिला होता. समाजकल्याण खाते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.अशा लढाऊ नेतृत्वाला काँग्रेसने पुनश्च विधान परिषदेवर संधी देऊ केली होती. पण मतलबी राजकारणी आणि निवडणुकीत होणारा घोडेबाजार यामुळे सच्चा नेतृत्वाला डावलले जाऊ शकते हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मुळात हंडोरे हे संघर्षवादी नेते आहेत.तळागाळातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ते विजयी झाले असते तर नक्कीच त्याचा फायदा काँग्रेसला झाला असता यात वाद नाही पण मतांच्या आकडेवारीत नेहमीच दलित नेतृत्वाला दुय्यम स्थान दिले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असो आंबेडकरवादी चळवळीमध्ये असंख्य गट आहेत पण भीम विचारधारा हे सर्वांचे बलस्थान आहे म्हणूनच पक्षभेद विसरून तमाम दलित बांधव हंडोरे यांच्या विजयाची आस धरून बसला होता.
काँग्रेसने ही म्हणावी तेवढी ताकद त्यांच्यासाठी लावली नाही. आपापले संबंध जपत असताना एका दलित नेतृत्वाचा पुन्हा एकदा राजकीय बळी गेला आणि याचे दुःख राज्यातील तमाम दलित बांधवांना झाले आहे.
मुद्दामहून या निवडणुकीत भाई जगताप आणि प्रसाद लाड यांचा संघर्ष दाखविण्यात आला यामध्ये हंडोरे यांना धोका आहे असे कुठेही सुचित करण्यात आले नाही किंवा मिडियावाल्यांनी सुद्धा याबाबत शब्द काढला नाही त्यामुळे गाफील ठेवून आपापले हितसंबंध जोपासत विजय प्राप्त केले गेले आणि हंडोरे यांचा पराभव झाला.
आपल्यातील कर्तुत्व क्षमतेने सामाजिक न्याय विभागाला त्यांनी उंची प्राप्त करून दिली होती त्यामुळे एक आशादायी वातावरण निर्माण झाले होते पण निराशा झाली असो हम होंगे कामयाब..
-संघर्ष जारी है…
जय भीम
–डी. एस. गायकवाड
९८९०१५३३३०