December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

महाराष्ट्राचं वैभव पंढरीची वारी प्लॅस्टिक मुक्त वारी होणं शक्य आहे.- स्वाती राहुल चव्हाण

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरीचा महाउत्सव म्हणजे आषाढी एकादशी. दरवर्षी चंद्रभागेच्या तिरी आषाढी एकादशीच्या रूपाने भरणारा हा वैष्णवांचा मेळा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

संत कृपा झाली इमारत फळा आली

ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया

नामा तयाचा किंकर तेणे विस्तारीले आवार

जनी जनार्दन एकनाथ स्तभ दिला भागवत

तुका झालासे कळस भजन करा सावकाश

बहिणा फडकती ध्वजा तेने रूप केले ओजा

 

    संत बहिणाबाईंच्या अभंगातील ओवीतून आपल्याला महाराष्ट्रातील संत परंपरेचे यथार्थ दर्शन घडून येते. महाराष्ट्रात अगदी ज्ञानदेव पूर्व काळापासून वारीची परंपरा अस्तित्वात असल्याची बोलली जाते. आपण जिथे आहोत त्या ठिकाणच्या कर्म स्थळापासून पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी काढण्यात आलेली पदयात्रा म्हणजे वारी आणि या वारीत सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे वारकरी. ही वारी अठरा पगड जातीतल्या लोकांना सामावून घेते म्हणूनच ती अख्या जगाला समतेचे तत्त्वज्ञान सांगते. महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्या संत साहित्यातून दांभिकतेवर आणि अंधश्रद्धेवर कायमच आसूड ओढल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.

 

भले तरी धरु कासेची लंगोटी

नाठाळाच्या माथी हाणू काठी

 

असे म्हणत तुकोबा रायांनी नाठाळ, दुर्जनांचा समाचार घेतला आहे.

तर संत सावता माळी

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी

लसूण मिरच्या कोथिंबीर | अवघा झाला माझा हरी ||

मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापली पंढरी ||

सावता म्हणे केला मळा | विठ्ठलापायी गोविला गळा ||

 

त्यांच्या या अभंगातून कर्मावरच केलेली मनापासूनची भक्ती हा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे असे सांगतात.

 

प्रपंच असुनी परमार्थ साधावा |

वाचे आठवावा पांडुरंग ||

 

   आपण करत असलेले काम सर्वोत्तम रीतीने केले तरीसुद्धा ती विठ्ठलाची भक्तीच ठरते असं मत संत सावतामाळी यांनी आपल्याला सांगितले आहे. या आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने पायी चालत चालत दर्शनासाठी येऊन पोहोचतात. अशावेळी अनेक ठिकाणी मुक्काम आणि विसावा घेऊन ही वारकरी मंडळी पुढील दिशेने वाटचाल करत असतात. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी जिल्हा, तालुका आणि गाव प्रशासन या वारीसाठी सज्ज असतं. निदान एक ते दीड महिना आधीपासून या वारीच्या नियोजनाची तयारी चालू असते. मात्र ज्या पद्धतीने वारीसाठी नियोजन पूर्व तयारी केली जाते आणि त्यानंतर वारीहून वारकरी परतल्यानंतर ही प्रशासनाचे काम संपत नाही. वारी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो स्वच्छतेचा आणि कचरा व्यवस्थापनाचा.

महाराष्ट्राला स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त वारी द्यायची असेल तर त्यासाठी स्वयंप्रेरणा आणि नियोजन गरजेच आहे. ज्याप्रमाणे ईश्वर भक्तीचा संदेश ही वारी देते त्याचप्रमाणे स्वच्छता हीच ईश पूजा आहे हे सुद्धा आपल्याला ठसवता आलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या आधुनिक आणि स्वच्छतेचे आद्यजनक म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो ते महान संत गाडगे महाराज यांनी स्वतःच्या कृतीतून आणि वाणीतून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्याप्रमाणे आषाढी वारी ही निर्मल वारी ठरावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

   लाखो वारकऱ्यांच्या जनसमुदायाचे नियोजन आणि वारीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन अशक्यप्राय बाब नाही. परंतु आपल्या महाराष्ट्रात संतांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेतच देव आणि कर्मातच ईश्वर भक्ती पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक वारकऱ्यात असायला हवी. तशी स्वयंप्रेरणा प्रत्येक वारकऱ्यात दिसली तरच ही वारी निर्मल वारी होईल. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नीट पालन करणे, त्यानुसार स्वच्छतेचे नियम पाळले तर नक्कीच ही वारी स्वच्छ आणि सुंदर होईल.

 

प्लास्टिकच्या वापरातून होणारे दुष्परिणाम आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी प्रबोधन करण्याचे प्रभावी साधन म्हणून या वारीकडे पाहता येईल. प्लास्टिक ऐवजी पर्यायी घटकांचा अवलंब करून प्लास्टिक मुक्तीकडे वाटचाल करता येणे नक्कीच शक्य आहे. त्यासाठी स्वयंप्रेरणेचीच जास्त गरज आहे असे मला वाटते. प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र या मोहिमेतून अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध होऊ शकते. याचा शासन स्तरावर विचार होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सध्या संविधान जनजागृतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या बार्टीतर्फे संविधान दिंडी आयोजित केली जाते. ही जनजागृती किती प्रमाणात यशस्वी होईल हा संशोधनाचाच विषय ठरेल. परंतु संविधान जनजागृती असो किंवा प्लास्टिक मुक्ती यासाठी या अभियानांकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन ईश्वराच्या भक्ती इतकाच निर्मळ असेल आणि प्रत्येक गोष्टीत कर्मात, कृतीत जर देव पाहायची मानसिकता असेल तर ही वारी नक्की सुफळ संपूर्ण होईल.

लेखिका- स्वाती राहुल चव्हाण,टेंभुर्णी 

(लेखिका ग्रामीण विकास या विषयातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत)

Related posts

जिजामाता कन्या प्रशालेच्या १२०० विद्यार्थिनींची प्रभातफेरी

yugarambh

समावि प्राथमिक ,अकलूज येथे क्रांतीदिन साजरा 

yugarambh

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील गावांची नावे जाहीर झाली…

yugarambh

मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात ‘मोदी माफी मागो’ आंदोलन : नाना पटोले

Admin

सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांना संग्रामनगर येथे अभिवादन

yugarambh

युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

yugarambh

Leave a Comment