लवंग (युगारंभ )- भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने अकलूज शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीची सुरुवात केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव व मुख्याध्यापिका मंजुश्री जैन मॅडम यांनी हिरवा ध्वज दाखवून केली.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मना-मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना आणि क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे म्हणून या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका जैन मॅडम यांनी सांगितले.
‘भारत माता की जय’,’वंदे मातरम’,’जय जवान जय किसान’ अशा जयघोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला.सदुभाऊ चौक-महावीर पथ-गांधी चौक,भाजी मंडई-एसटी आगार-सदुभाऊ चौक-प्रतापसिंह चौक-रत्नाई संकुल असा प्रभातफेरीचा मार्ग होता.
यावेळी पर्यवेक्षक के.डी.सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी वाय. के. माने-देशमुख, जी.जे.पिसे, एस.के.कांबळे यांच्या समवेत शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रभातफेरी यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.