लवंग (युगारंभ )20 : मिरे (ता. माळशिरस) येथील किरण नवगिरे हिची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवनारी किरण ही सोलापुरची दुसरी खेळाडु आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थित श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत असताना तिने विविध क्रीडा स्पर्धा गाजविल्या होत्या. पुढे पुणे विद्यापिठ महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड, अरुणाचल प्रदेश कडुन खेळत सराव आणि सातत्याच्या बळावर तिने भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे.
येत्या दहा सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी तिचा टी-ट्वेंटी महिला संघात समावेश झाला आहे. सोलापूरच्या क्रिकेट क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. सोलापुरातील रागिणी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून तिने अनेक सामने खेळलेले आहेत. माळशिरस तालुक्यातील मिरे या आडवळणी गावातील अल्पभूधारक शेतकरी प्रभू नवगिरे यांची मुलगी आहे. सत्तावीस वर्षीय किरण ही नागालंड क्रिकेट संघाकडून सलामीवीर बॅट्समन (फलंदाज) म्हणून खेळतेय. जोरदार फटकेबाजी करणारी अशी तिची ओळख असून, तिने गेल्या मोसमात अवघ्या ७६ चेंडूत १६२ धावांची तडाखेबाज खेळी करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. नागालंडकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या वरिष्ठ महिलाच्या देशांतर्गत टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील प्लेटग्रुपमध्ये तिने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. सात सामन्याची ही देशांतर्गत टी-ट्वेंटी मालिका होती. याच मालिकेतून तिला अखेर आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यांसाठी भारतीय महिला टी-ट्वेंटी संघात ब्रेक मिळाला. या सात सामन्यांच्या मालिकेत तिने ५४ चौकार आणि ३५ षटकार खेचले आहेत. याशिवाय पुण्यात झालेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी चालेजमध्ये ३४ चेंडूत ६९ धावांची उल्लेखनीय कामगिरी बजावली. तिच्या या प्रशसनीय खेळीमुळेच येथूनच तिची आंतर राष्ट्रीय क्रिकेटकडे वाटचाल सुरु झाली.
किरण नवगिरेची भारतीय महिला टी-ट्वेंटी संघातील निवड म्हणजे तिच्यासाठी सुखद धक्का आणि आश्चर्यकारक असल्याचे तिने म्हंटले आहे. माझी संघातील निवडीची सुखद बातमी मी माझ्या वडिलांना सांगितली. आमचा आनंद द्विगुणीत झाला होता. ही माजी खरी सुरवात होती. महिलाच्या टी-ट्वेंटीमध्ये जलद धावा कुटण्यासाठी माझे डोळे उघडले. त्यामुळे रनिंग बिट्वीन विकेटवर मी खूप काम केले. आंतरराष्ट्रीय भागीदारी क्रिकेट खेळाडूला चांगला ऑपरेटर बनण्यास मदत करते. किरण म्हणते, आगामी देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीसाठी गेल्या दोन महिन्यापासून ती पुण्यात टेक्निक (तंत्र) आणि टेम्परामेंटवर अथक मेहनत घेतली आहे. निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मोठ्या खेळीसाठी माझ्या खेळण्याच्या शैलीवर काम करावे लागणार हे मी ओळखून होते. इंग्लंडमध्ये खेळणे म्हणजे एक आव्हानच आहे. त्यांच्याकडे मोठ्या अनुभवी गोलंदाजांची फळी आहे. मी भरपूर तयारी करेन आणि माझ्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करेन.”
मला गोलंदाजावर तुटून पडणे आणि षटकार खेचणे खूप आवडते. तरी मी एखाद्या लूस चेंडूची नक्कीच प्रतीक्षा करेन. शेफालीने तिच्या तंत्रावर ज्या पद्धतीने काम करते ते कौतुकास्पद आहे. असे किरण ने नमूद केले.
ती एक नैसर्गिक पॉवर हिटर आहे. तिची ताकद हे तिच्या लहानपणी शेतात कुटुंबियांच्यासोबत काम आणि त्यांना मदत केल्यामुळे तिला बळ मिळाले. आणि वाढत्या वयात तिने खेलेल्या विविध खेळांमधून तिला बळ मिळाले. ती शॉट पुट आणि भाला फेकायची, कदाचित
हेच तिच्या पॉवर हिटिंगचे रहस्य असावे. ती एम. एस. धोनीची मोठी फॅन आहे. नेटवर दररोज सराव करताना शून्यावर बाद झाल्यानंतर तिला प्रचिती आली की ती दररोज मजा म्हणून षटकार मारू शकत नाही. त्या शून्याने खेळाकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोन बदलला. महिला टी-ट्वेंटी चॅलेंजनंतर तिने क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि टी याकडे व्यावसायिकाप्रमाणे विचार करायला सुरुवात केली.
ती एकच नेट सेशन करायची, पण आता पहाटे साडेचार ते रात्री दहापर्यंत ती अकादमीत असते, ती कॅन्टीनमध्येच जेवत असते. आगामी इंग्लंड दौरा हा तिच्यासाठी तिच्यासाठी एक शिकण्याची संधी असेल आणि तिला तिची प्रतिभा दाखवण्यासाठी एक संधी असणार आहे.
भारताचा टी-ट्वेंटी संघ असा राहील: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमाह रॉड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सब्बिनेनी मेघना, भाटिया (तानिया), राजेश्वरी गायकवाड, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (डब्ल्यूके), किरण प्रभू नवगिरे.
अखिल भारतीय महिला निवड समितीने शुक्रवारी भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघांची घोषणा केली. भारत १० सप्टेंबरपासून इंग्लंडमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
‘बाप’च खरा मार्गदर्शक.
शिक्षक, आईबाप आणि शिकणारी मुले या तिघांनी ठरविले तर, निश्चितच काहीतरी चांगले घडते. मी अंगठे बहाद्दर आहे. रोज लोकांकडे काम करणारा माणूस आहे. पण, मी कधीच हार मानत नाही. मी शिकलो नाही. पण पोरं शिकवली आहेत. पोरं चांगली शिकली याचा आनंद आहे. कुठेही सामना असला तर, किरण अगोदर मला फोन करते. खेळाबाबत चर्चा करते. कुठे बॉल गेला तर कसा मारायचा हे मी तिला सांगतो. बॉल कसा हाणायचा म्हणजे उंच जाईल. कसा हाणला तर भुईटी जाईल. हे मी तिला सांगतो. त्यावेळी, ती जाम खूश होते. दादा तुमचे विचार मोठे आहेत. तुम्ही सांगताय तसेच खेळण्याचा मी प्रयत्न करते असे म्हणते. त्यावेळेला मलाही खूप आनंद होतो.
– प्रभू महादेव नवगिरे