माळीनगर (युगारंभ )-प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या वतीने ‘भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे’ आयोजन रविवार दि. २१/०८/२०२२ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल,अकलूज याठिकाणी करण्यात आले होते.स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाचे संस्थापक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व विजेत्या संघाना शुभेच्छा देऊन पुढील वर्षीही यापेक्षा मोठया प्रमाणात स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. चालू वर्षी स्पर्धेतील सहभागी संघांची संख्या व स्पर्धकांचा उत्साह पाहता पुढील वर्षी प्रथम क्रमांकास रु. ४१०००/- द्वितीय क्रमांकास रु. ३१०००/- तृतीय क्रमांकास रु. २१०००/- चतुर्थ क्रमांकास रु. १५०००/- व पाच ते आठ क्रमांकास प्रत्येकी रु. ७०००/-बक्षिसे जाहीर केले.
मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनीही सहभागी व विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेस सोलापूर या जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकूण ४३ संघांनी सहभाग नोंदविला.
‘आट्यापाट्या’ हा ग्रामीण क्रीडा प्रकारात योगदान दिलेल्या जिल्ह्यातील विविध भागातील जेष्ठ खेळाडू लक्ष्मण वाघमोडे, तानाजी पाटील उत्तरेश्वर सावंत, बंडू सुरवसे, दादा पाटील, गोरख कोळेकर, धर्मराज नागणे, नागनाथ लवटे, पोपट भोसले, शांताराम गाजरे, आबासाहेब ताटे- देशमुख, विजय यलमार, सुग्रीव मिटकल, रविंद्र मिसाळ, पोपट जगताप, नंदकुमार पाटील, रमेश तवटे, मधुकर गायकवाड, सयाजी पाटील, एकनाथ पवार, शहाजी पवार, पांडुरंग चव्हाण, महादेव फाटे, चंद्रकांत सत्रे, बंडू देठे, बाळासाहेब रुपनवर, विलास इंगळे यांचा सन्मान व सत्कार मा.श्री.विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून खेळाडूंचा उत्साह वाढविला व सामन्याचा आनंद लुटला.
स्पर्धेदरम्यान मा.चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील, मा.श्री.अमरसिंह माने-देशमुख, मा.श्री. हर्षवर्धन खराडे पाटील, मा.श्री. नितीन निंबाळकर, मा.श्री. नरेंद्र धुमाळ यांनी भेटी देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला.
सकाळी १० वाजल्यापासून सुरू असलेल्या स्पर्धा रात्री १२.०० पर्यंत सुरू होत्या. अंतिम सामना काशिलिंग तालीम धाईटी (सांगोला) व जय बिरुबा, कचरेवाडी (माळशिरस) या संघात झाला.
अत्यंत रोमहर्षक व चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात काशिलिंग तालीम, धाईटी (सांगोला) या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रु. २१०००/- व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. उपविजेता संघ जय बिरुबा, कचरेवाडी (माळशिरस) या संघास द्वितीय क्रमांकाचे रु. १५०००/-, तृतीय क्रमांक भैरवनाथ क्रीडा मंडळ, परिते (माढा) या संघास रु. १००००/- तर चतुर्थ क्रमांक सिदाचीवाडी (माळशिरस) यांना रु. ५०००/- चे पारितोषिक मिळाले.
स्पर्धेचे समालोचन ए. एम अडसूळ, बापूसाहेब लोकरे यांनी तर सूत्रसंचालन तय्यब खान, शकील मुलाणी यांनी केले. स्पर्धेत ६० तज्ञ पंचांनी कामकाज पाहिले. आभार संचालक यशवंत माने देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमास मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खेळाडू, प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा मा. दिदीसाहेब यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकारी, सर्व सभासदांचे कौतुक केले.