December 1, 2023
yugarambh
Breaking News
Otherपरिसर

येसण…आबाचा बैलपोळा(ग्रामीण कथा )-लखन साठे (पेरूवाला )

बैलपोळा हा ग्रामीण संस्कृतीतील महत्वाचा सण.त्यानिमित्त आयुष्यभर येसण,म्होरक्या तयार करणार्या आबाची ही कथा… ‘येसण.!’

     आयुष्यात कितीही कटू प्रसंग आले तरीही माझा आबा आयुष्याला उत्तर देत जगत असताना मी बघितला. “आबा” म्हणजे माझा आजोबा. उत्तम कारागीर-गुरांना येसन, म्होरकी , दोरी, बाज इननारा ,केरसुणी बनवणारा आबा.

तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या दिवशी बैलपोळा होता…

   आबा बैलांना चारा टाकुन त्यांना रंगवत आहे. मी बाजेवर बसलेल्या आजी सोबत गप्पा मारत बसलोय .ती सांगतेय त्यांनी आयुष्याभर काय काय कष्टाची कामे केली.

ते मी ऐकतोय.”लय दिस चराट्याचा धंदा केला. “

मी म्हणालो काय असत हे ?

“आर ते लय वंगाळ काम पर त्या येळी पोटाची आग भागवण्यापाय करावं लागायच ते काम ” .

“तुला नाय कळायच?”

मी : “सांग ना गं आजी..

“आता मी बसलीयना या बाजेवर याला त्यावेळी येगळी दोरी लागायची”.

त्या “दोऱ्या-दोरकंड,कान्या, गाय गुरांच्या येसनी आणिक,मोरक्या,कासरे मुसक्या तयार करायच्या न इकायच्या’.””लय धंदा केला बग ही “

पर…”.

म्हणून म्हातारी रडायला लागली.मला काहीच कळना ?

लगेच शांत ही झाली.

“आमी काय करायचू” .

“नवरा बायकुच्या चार पाच जोड्या एक व्हायचू “.

“अन शेतकऱ्यान त्याच्या शेतीला घातलेल्या कूपान(कुंपण) म्हणून लावलेली केकताड तोडायचू “.

“ते बी कस?”

“ती केकताड आधी त्या शेतकरी मालकाकडन कमी ज्यास भावात ठरवायची .”

“इकत घ्यायची. “

“अन नारळ फोडून 

कोयत्याने कापायला सुरुवात करायची”.

“लय दिस काम चालायचं”.

“म्हातारी सगळं सांगतेय मी फक्त ऐकत होतो “.

“तुला माहीत पण नसलं केकताड, केकत,आर घायपात “.

मी गप्प च?पुढं काय ते सांग “.

“गडी माणसं केकतिच्या फण्या कापायची “.

“आमी बाया त्या गोळा करून 

वाकाच्या बुरकुलांन त्याच काटं ओरबाडून काडायचं”.

“मग बाया त्या फण्या/फड .एक एक करत चिरायच्या”.

“फडचिरताना त्याचा रस बोटांना चावायचा”. 

“भोकं पडत हुती.” 

“का तर ?”

” चिरणीच्या टोकमुळे बोटास्नि बूळकं पडायची”.

“त्यात केकताडाच्या फडाचा रस गेला की भड भड उटायची”.

“त्याला तिकाट पर लागू देत नसायचं “.

“मग बोटांना फडकं बांदायच”.

” अन चिरायचं काम करायचं. 

तरीबी”लयच दुखत आसल ना तर दोन तीन दिस सुटी घ्याची”.

“मैदाळ कष्ट असायचं बघ.”

“मधीच आमाला त्या केकताडावर मधाच मव्हाळ दिसायचं”.

“मग ते मधमाश्या चावल्या तरीबी ते काढायचच .”

“मध खायाला मिळायचा .”

“तुझ्या बाला लय मद चारलाय वाटी वाटी “.

“माश्या चावल्याना ,

तीन चार दिवस सूज वसरत नव्हती “.

“तुझ्या आबाला डोळ्याला माशी चावली हुती .

“डोळा गायब झालता चार दिस .”

“अन म्हातारी हसायला लागली”. 

तिकडून आबा बैलांच्या अंगावर रंगाने हाताचे ठसे उमटवत . म्हणतोय कसा ? आजीला

 “हसून सांग सगळ्या गोष्टी नातवाला “

म्हतारी आबाकडे बघून गालातल्या गालात हसते.

अन म्हातारी मला सांगायला लागते .

“आर त्या फडाच्या रशाने(रसाने)अंगाला गांदी यायच्या अंग खाजवायचं.”

“मी म्हणालो ते जाऊदे 

पुढं काय ते सांग?”.

“ते फड चिरायचे मजी त्याच्या

बारीक बारीक वादया काडायच्या.”

” त्या चिरलेल वाद्या,वाळू टाकायच्या .”

“चार पाच दिवसांनं पेंड्या बांदायच्या”

“त्या पेंड्या पाण्यात चार दिस 

भिजू टाकायच्या.”

“चार दिसानी खालचं आंग वर करायचं व पूना चार दिस भिजू द्यायच्या “

“तेवढ्यात तिकडून आंबाची हाक येते 

“ये पोरा इकडं ये “.

“बास कर तुझं चराटपुराण म्हातारे “.

“मी म्हणालो थांबा आबा ऐकुद्या “.

मग म्हातारी म्हणते.

“आठ दिसानं भिजलेल्या पेंड्या 

पिळ करून लाकडान बडवायच्या.” “त्याचा रेंदा काढायचा रस काढायचा”.

“परत वाहत्या पाण्यात खळा खळा धुवून चढावर त्या पेंढ्या नितळू लावायच्या”.

“मंग उनात वाळवायच्या .परत सुतळी सारखा पांढरा वाक मिळतो.”

“वाक फिरकीन वळून दावी बनवायची.”

” त्याचा कासारा. मग गुरांनला दावी, शिक,गोफण,म्होरकी .मोटचा नाडा ,साळवता, वाकाच्या गोंडयाचा कंडा बैलांच्या गळ्यात बांधायला ‘धारकी’

‘कान्या’ शेरडांच्या गळ्यात बांदायला कंड लहान,बैलासनी मोठा कासरा घाटीचा कंडा ,

येसन ‘बैल आरी आणायला बघ

शिक टोपल ठेवायला 

मेंडरांचीच ‘वागर’

सापती दाबनाणे इनल्याली बैलांच्या माणवर ‘सापती’ कडन घुंगरूच्या मदी घाटी पर

घुंगरी तीन तीन बोटाच्या अंतरान घुंगरू बांधायचं सगळंच तुला सांगतीय”

 ” हे सारं करत हुतु बघ “

“पण केकत कापत असताना 

माझा लक्ष्मण गेला अन म्हातारी रडायला लागली.”

मी शांत हो आजीला म्हणालो.

आबाची पुन्हा हाक आली आबा जवळ गेलो .मग आबांन सांगायला सुरुवात केली .

“आर तुझा चुलता लक्ष्या पण माझ्या बराबर केकताड कापत हुता .”

“कापता कापता तिथं आशील नाग निघाला”.

त्याला चावला म्हातारं पण रडायला लागलं.”

बाळा, माझा लक्ष्या पाय खोडून आमच्या डोळ्यासमोर गेला .”

“म्या इळ्यान सापाच्या खांडूळ्या केल्या पर माझा हाता तोंडाला आलेला पोरगा गेला .”

मी म्हटलं शांत व्हा आबा .

आबांचे डोळ्यातले आश्रू लगेचच विरले .

आबा बोलतच होता.

“तवा पासनं तुझ्या बापानं कधी 

केकताड कापाय इळा हातात घितला नाय”. 

“आन् म्या बी त्याला त्यो घिवू दिला नाय”.

“म्या घ्यायचो पर भाऊसायबाच्या 

बैलपोळ्या पुरताच”.

“त्या आधी लय चऱ्हाट्याचा धंदा केला.”

“पोटा पुरत मिळालं पर सख्याला तुझ्या बा ला काय तालुक्याच्या शाळत धाडू शकलू नाय.”

“त्यानं बी नेटानं अंगावर पडल ते काम केलं ,आन तुझ्या जन्माच्या येळी म्हणला माझ्या पोराला आबा मैंदाळ शिकवणार.”

“लय कष्टातन तुला शिकावलं बघ.”

” एवढ मोठ शिकवुन तूला आज मास्तर केल.”

” आन तू मला बरं वाटाव म्हणून 

माझ्या साठी बैल जोडी घितली”. 

“ती बी किती मैंदाळ पैस खर्च करून .”

“आन आज मी स्वतःच्या हातानं त्यांना सजवतुय ,रंगवतुय “.

“या पक्शी दुसरा आनंद काय नाय बाबा “.

“या परास दुसरा आनंद काय नाय ग धुरपे “

अशी मोठ्याने आरोळी देत,

 स्वतः च्या बायकोला व मला बोलत बोलत

आबा ने हासत हासत आनंदाने प्राण सोडला .मला काय करावं सुचलं नाय .

तोच आवाज कानात घुमत होता.

मी ओरडलो .

आबा…सर्वजण पळत आले ….

मला जगणं शिकवनारा माझा आबा अचानक गेला .तो पण बैल पोळ्या दिवशीच .

बैलपोळ्यासाठी दोरखंड वळणारा,वेसन बनवणारा, म्होरकी बांधणारा, आबा आज बैलांची वरात बघायला राह्यला न्हाय .अचानक मला जुने दिवस डोळ्यासमोरून तरळू लागले. आबानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या

आबा मला नेहमी सांगायचा गावात या सणाच्या आदल्या दिवशीच दिवसभर गाय गुरे, बैलं धुवून, बैलांची खांद मळणी करायची ,दुसऱ्या दिवशी म्हजें बैल पोळ्या दिवशी बैलांना सजवायचं त्यांची वाजत गाजत हालगी,सनई आण् बँड च्या तालावर नाचत मिरवणूक काढायची .

अन् संध्याकाळी बैल जोडीची पूजा करायची .पुरण पोळी चारून सर्वांनी दर्शन घ्यायचं. हे सारं….

बैलपोळा सणाचं वैभव आनंदाने साजरी करणारं भाऊसाहेबांच कुटूंब मात्र आजच्या घडीला सर्व दुकानात मिळणार दोर आणि रेशीम म्होरकी गळ्यातला साज दुकानातून विकत घेताना दिसत आहे.आणि आम्ही मात्र आबा मूळ बैल पोळा साजरी करायला लागलो होतो पण आता त्यापासून खूप दूर गेलो आहे .कारण आज आबा नाहीत . आबा माझ्या शिक्षणासाठी भाऊसाहेबांच्या शेतात चाकरीला होता.तिथंच त्यांना बैलांचा नाद लागला.त्यांना बैलं सजवण्यात खूप आनंद वाटायचा हे मी जवळुन बघितले होते .प्रत्येक वेळी आबांनी एकच सांगितले.

“की तू फक्त कष्ट घे थांबू नको, बाकी सुख तुला आपोआप मिळेल .” आबांची खूप आठवण येतेय .

आता हे सण साजरे केले जातात. पण या सणांच्या जीवावर कैकांना जगवणारी दोरखंड येसनी म्होरकी बनवण्याची मूळ कला नामशेष होत चालली आहे. ती बनवणारी माणसे ही कमी होत चालली आहेत . बैल ही कमी होत चाललेत .शेतीकाम करणारा बैल ऐवजी अलीकडे ट्रॅक्टर आला आहे .आता ऊसतोड मजुराला ही काम मिळणार नाही कारण ऊसतोडणी मशीन आले आहे.विज्ञानाच्या प्रगती मुळे आधुनिक क्रांती होत आहे. इथून पुढे लोकं बैलपोळा सण विसरूनही जातील कदाचित पण मी मात्र माझ्या आबाला विसरू शकत नाही….

सर्वांना बैलपोळा सणाच्या आभाळभर शुभेच्छा…..

लेखक -लखन साठे पेरुवाला

मो:9665040095

Related posts

जिजामाता कन्या प्रशालेच्या १६०० मुलींचा पारंपरिक भोंडला खेळात सहभाग

yugarambh

‘झुंड’चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष

Admin

अकलूज अध्यापक विद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात

yugarambh

अकलूज गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

yugarambh

चिमुकल्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद… महर्षि महोत्सवास प्रेक्षकांची अलोट गर्दी

yugarambh

माळशिरस तालुक्यात लंपीच्या लसीचा काळाबाजार… पशुवैद्यकिय अधिकारी व खाजगी व्यक्तींची मिलीभगत

yugarambh

Leave a Comment