लवंग (प्रतिनिधी) : रोटरी क्लब अकलूज वतीने दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर येथे पर्यावरण पूरक अशा शाडू माती पासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या शाळेतील कलाशिक्षक संजय पवार सर यांनी २४० विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण देताना पवार सर यांनी माती पाण्यात कशी भिजवावी, किती प्रमाणात भिजवावी हे तपासून ते गणपतीच्या आसनापासून ते मुकुटापर्यंत प्रत्येक भागाचे मातीचे गोळे बनवून त्यास कशा पद्धतीने आकार द्यावा व मधून मधून सुक्या मातीचा आधार कसा घ्यावा याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. याचा आधार घेत विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांची स्वतःची कल्पकता वापरत वेगवेगळ्या आकर्षक गणेश मूर्ती बनवल्या. रोटरीचे अध्यक्ष विधीतज्ञ दीपक फडे यांनी विद्यार्थ्याच्या या कल्पकतेचे कौतुक करत उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी या कार्यशाळेचे उद्घाटन मॉडेल विविध प्रशाला चे सचिव विधीतज्ञ सचिन बधे यांचे हस्ते व संचालक अनिल रासकर कल्पेश पांढरे यांच्या उपस्थितीत झाले.
या प्रसंगी बोलताना सचिव सचिन बधे यांनी सांगितले कि, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणपती मूर्तींचे लवकर विघटन होत नाही, त्यांची विटंबना होवू शकते. या मूर्ती ज्या तलावात, नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात, तेथील पाणी प्रदूषित होते व याचा परिणाम निसर्गावर तथा मनुष्य प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत होतो त्यामुळे या बाबी टाळून पर्यावरण पूरक अशा गणपती मुर्तींचे गणेशोत्सवात पूजन होणे हे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याच्या दृष्टीने व मनुष्य प्राण्यांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या दृष्टीनेच ही कार्यशाळा रोटरी क्लब अकलूजच्या सहकार्याने आयोजित करण्यामागचा हेतू असल्याचे सांगितले.
कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांचा मूर्ती बनवताना चा आणि स्वतः बनवलेली मुर्ती सर्वांना दाखवतानाचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या कार्यशाळेत पालक, शिक्षक वृंद, रोटरी सदस्यांनी सुद्धा सहभाग घेत मूर्ती बनवण्याचा आनंद लुटला. मुलांनी सुद्धा कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांना तसेच प्रशिक्षक संजय पवार सर यांना धन्यवाद दिले.
या कार्यशाळा प्रसंगी रोटरी सदस्य डॉ.बाहुबली दोशी, गोमटेश दोशी, अजिंक्य जाधव तसेच या शाळेचे संचालक उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प संचालक रो.कल्पेश पांढरे, रो.पृथ्वीराज भोंगळे व प्रकल्प प्रमुख रो.स्वप्निल शहा यांनी विशेष परिश्रम घेतले तर आभार सचिव रो.केतन बोरावके यांनी मानले.