लवंग (युगारंभ )-मागील आठवड्यात गणरायाचे उत्साहात आगमन झाले परिसरात घरोघरी तसेच अनेक युवक मंडळामध्ये गणेशाचे मनोभावे प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. याचबरोबर गौरी चे आगमन देखील मोठ्या आनंदाने साजरे करण्यात आले. यंदा फळे , सजावट वस्तू , हार फुले यांचे दर चांगलेच वधारले आहेत तरीही उत्साह कमी झालेला नाही .
माळीनगर ता.माळशिरस येथील गजेंद्र पोळ व सुवर्णा पोळ यांनी यावर्षी राजमाता जिजाऊ बालशिवाजी ला स्वराज्याचे धडे देतानाचा देखावा सादर केला होता २०१४ पासून पोळ कुटुंब टाकाऊ वस्तूंपासून विविध सामाजिक, पर्यावरण प्रबोधन विषयक देखावे करत आहेत.
विशेषतः महिला भगिनींचा उत्साह व आनंद शिगेला पोहचला होता. “लेकी आल्या माहेरा ” या उक्ती प्रमाणेच गौरींचे घरोघरी पूजन करून गोडधोड नैवेद्य , आकर्षक सजावट , सुंदर छत उभा केले होते. सकाळपासून महिलावर्गाची सणामुळे लगबग सुरू होती. भारतीय संस्कृती मधील अनेक सणउत्सव नाते सोयरे यापलिकडे जाऊन लोकांना प्रेम आपूलकी शिकवतात याचाच प्रत्येय क्षणोक्षणी परिसरात येत होता .
बाजारात गौरीचे मुखवटे ,दागिने , सजावटीच्या वस्तू , घेण्यासाठी गर्दी होती. गौरी गणेशाला फराळाचा नैवेद्य दाखवण्यासाठी महिला फराळाचे पदार्थ बनविण्यात मग्न होत्या. एकमेकांना सहकार्य करून सणांचे महत्व अबाधित ठेवण्याचा मुळ हेतू यामुळे साध्य होते .
माळीनगर परिसरात सध्या गौरी गणपतीच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज सकाळी सायंकाळी आरतीचे आवाज दुमदुम लागल्याने आबालवृद्ध पासून सर्वच सणांचा मनमुराद आनंद घेत आहेत. शेतकरी , कष्टकरी व सर्वसामान्यांच्या मनातील गणपती व स्त्रियांच्या श्रद्धेला उतरणारी गौरी आपल्या भक्तांना मनोभावे आशीर्वाद देत आहेत अशीच भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.
माळीनगर येथील पोळ कुटुंबाने महालक्ष्मीच्या निमित्ताने उभा केलेला राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांचा देखावा