माळीनगर (युगारंभ ): अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विज्ञान विभागाच्या वतीने वृक्षारोपणासाठी रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिजामाता कन्या प्रशालेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना या रोपांचे वाटप करण्यात आले. जवळपास 200 विद्यार्थींनींना चिंच, करंजा या वृक्षांची रोपे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकेंमार्फत वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत तसेच विज्ञान विभागाच्या वतीने महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी जुलै महिन्यात विविध वृक्षांच्या बिया गोळा केल्या व कोको पीटचा उपयोग करून त्या बियांचे रोपण महाविद्यालयांमध्ये करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तयार झालेली रोपे वाटपासाठी वापरण्यात आले.
सदर उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय संग्रामसिंह मोहिते पाटील, तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सभापती माननीय स्वरूपाराणी मोहिते पाटील व संस्थेचे सर्व माननीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच जिजामाता कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुश्री जैन मॅडम यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे , राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले व क्रीडा शिक्षक श्री कोरे के. के . तसेच जिजामाता कन्या प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. सूर्यवंशी,क्रीडा शिक्षक श्री. माने व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले तसेच विज्ञान विभागाचे प्रा.अमित घाडगे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका, कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.