माळीनगर (युगारंभ )मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी मराठ्यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्या बाबत सकल मराठा समाजाची माफी मागणेबाबत अकलूज येथील पत्रकार गणेश लक्ष्मण जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल द्वारे निवेदन दिले आहे.
निवेदनात पुढे असे सांगितले आहे की,आपल्या मंत्री मंडळातील जबाबदार उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद मध्ये हिंदुत्व गर्जना या कार्यक्रमात संबोधित करताना सतांतर झाले की लगेचच विरोधकांना आरक्षणाची खाज सुटली असे बेताल आणि बिनबुडाचे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री महोदय आपण स्वतः मराठा समाजाचे आहात. तसेच तानाजी सावंत सुद्धा मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे आम्हा समस्त सकल मराठा समाजाला आपल्या विषयी नितांत आदर आहे. परंतु सावंत यांच्या बोलण्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यांनी संपूर्ण मराठा समाजाने एकमताने घेतलेल्या भूमिकेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने हिनवण्याचा प्रयत्न केला. विरोध केला. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत कसून चौकशी करून आपली भूमिका स्पष्ट करावी.अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करतो.
तानाजी सावंत यांनी मराठा समाजाने घेतलेल्या 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने विरोध केला. आमच्या सारख्या सर्वसामान्य गरीब मराठा आंदोलकांना विरोधी पक्षांनी सोडलेली पिलावळ असे संबोधित केले. तसेच आज ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. दोन महिन्यांनी ‘एस सी’ मधून मराठे आरक्षण मागतील. असे तथ्यहीन बेजबाबदार वक्तव्य केले.
त्यातून त्यांनी दलीत समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला . उलट दलीत समाज बांधव मराठ्यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देतोय. कारण त्यां समाजातील जाणकार नेत्यांना माहिती आहे की मराठा समाज ‘एस सी’ चे आरक्षण मागत नाहीये. त्यामुळे दलीत- मराठा असा विवाद होणार नाहीत. हे वास्तव तानाजी सावंत सर यांना माहिती असायला हवे होते.
मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षण ही ठाम मागणी आहे आणि राहील. ती समाजाची एकमुखी अन् सांविधानिक मागणी असताना देखील एक जबाबदार मंत्री मराठ्यांच्या भूमिकेला विरोध करूच कसा शकतो?
याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टीकरण द्यावे असे सर्व समाजाला वाटत आहे. ओबीसी आरक्षण बाबत आणि तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सरकार ने भूमिका स्पष्ट करावी. यासंदर्भात महाराष्ट्रभरातून आपल्याला निवेदने पाठवली जातील. जर आपण या बाबीला हल्क्यात घेतले, तर मात्र तुमच्यासहित एकाही मंत्र्याला मराठा समाज माफ करणार नाही. गोरगरिब मराठा समाजाला भारत देश स्वतंत्र झाला तेंव्हा पासुन व्यवस्थेने डावलले आहे. जात म्हणून एकही लाभ मराठा समाजाला झाला नाही. मराठा समाज प्रचंड राष्ट्रप्रेमाणे ओतप्रोत भरलेला आहे म्हणून अनेक गोष्टी सहन करत आला आहे. पण आता सर्व संयमाचा अंत होत आला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री महोदय सरकार म्हणून आपणास प्रचंड रोषाला सामोरे जावे लागण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. याची नोंद घ्यावी.
अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांचे वतीने अकलूज, ता -माळशिरस, जि -सोलापूर येथील पत्रकार
गणेश लक्ष्मण जाधव यांनी मेल द्वारे दिले आहे.