माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात भोंडला हा पारंपरिक खेळ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेला भोंडला हा स्त्रियांचा सामुदायिक खेळ आहे. नवरात्रीचे नऊ दिवस व दसऱ्याच्या दिवशी हा खेळ खेळला जातो.मुलींना पारंपारिक सण-समारंभाची माहिती व्हावी व भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मैदानात मध्यभागी हत्तीची मूर्ती मांडण्यात आली होती.त्याची पूजा स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या मनीषा चव्हाण,राजश्री टकले,आरती सरडे,चैत्राली दोशी, वैशाली शेटे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक कल्लाप्पा सुर्यवंशी व पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. मुलींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये दांडिया व समूहनृत्य सादर केले.
यावेळी उपस्थित महिला मान्यवरांनी व प्रशालेतील १६०० मुलींनी फेर धरला.भोंडल्याची गाणी म्हणत पारंपरिक खेळ खेळत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.शेवटी सर्वांना खिरापत वाटण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री कणबुर यांनी केले.सूत्रसंचालन शोभा खराडे यांनी केले तर आभार अनुराधा कांबळे यांनी मानले.