माळीनगर (युगारंभ )-शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे माळशिरस तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख साहेब यांनी अकलूज केंद्राच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे आयोजित खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षण परिषद कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी बसवून निकाल वाढवणे, विद्यार्थी केंद्रीत अध्ययन अध्यापनावर भर देणे तसेच विविध नवीन पोर्टलच्या माहितीचे ज्ञान घेऊन कामे पुर्ण करावी तसेच यासाठी अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव सर हे चांगले काम करत असल्याचेही सांगितले.
या कार्यक्रमास अकलूज बीटचे विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे साहेब बी.आर.सी.माळशिरसचे विषयतज्ञ सतिश शिंदे, गणित विषयतज्ञ मुली नं2 शाळेतील पदवीधर शिक्षक प्रदीप कनाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव हे होते.
कार्यक्रमाचे आयोजन सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज शाळेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांनी केले.कार्यक्रमाची सुरवात संगीत वाद्यवृंदाच्या तालावर परिपाठाने झाली. त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील आणि आक्कासाहेब यांच्या प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
त्यानंतर विषयतज्ञांनी निपुण भारत उद्दिष्टे संकल्पना -मराठी विषय, निपुण भारत गणित विषय यावर मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे साहेब यांनी ऑनलाईन कामाचा आढावा घेऊन सूचना दिल्या.
त्यानंतर केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव यांनी सर्व शाळांसाठी आवश्यक प्रशासकीय सूचना दिल्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार गणेश करडे सर आणि गिरिश सूर्यवंशी सर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समुहगीताने झाली.संगीत विभाग प्रमुख अजिंक्य नवगिरे सर आणि समावि माध्यमिक शाळेतील गायन करणार्या विद्यार्थींनीचे सर्वांनी कौतुक केले
यावेळी शिक्षण परिषदेस अकलूज केंद्रातील सर्व खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका मोठ्यासंख्येने उपस्थित होते.