माळीनगर(युगारंभ )-परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. खरिपासोबतच आता रब्बी हंगामदेखील या सततच्या पावसाने धोक्यात आला आहे.
गेल्या चार दिवसापासून माळीनगर परिसरात जोरदार स्वरूपाचा परतीचा पाऊस सूरू आहे. गेला आठवडाभर परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे शेतात, रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचल्याने परिसर जलमय झाला.ग्रामीण भागातही परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडवली. दीड ते दोन तास सुरु असलेल्या पावसानं सगळीकडं पाणीच पाणी साचले आहे. निरा नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामासाठी घेतलेल्या खड्ड्यात पाणीच पाणी झाले असून, त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आधीच रस्ता नाही, त्यात पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,तसेच रस्त्यावर चिखल झाल्याने, विद्यार्थी व पालकांना निसरड्या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.
परतीच्या पावसाने दुबार पीक घेण्यासाठी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, हे पाणी दीर्घकाळ शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी वापरता येत असले तरीही या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वासामान्यही त्रासिक झाल्याचे चित्र परिसरात आहे.