अकलूज(युगारंभ )-यशवंतनगर येथील महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग येथे दिपावली निमित्त ‘दिपावली शुभकामना’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीवर आधारीत “कृष्णप्रिया कलादालन”,रांगोळी प्रदर्शन आणि थोर राष्ट्रपुरुष व त्यांचे योगदान, माझी शाळा, पाऊस, साहित्यिक तसेच नैतिक मुल्यांवर आधारित “मृदगंध” या हस्तलिखिताचे उद्घाटन स्थानिक प्रशाला समिती सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अॕड.नितिनराव खराडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शि.प्र.मंडळाच्या संचालिका निशा गिरमे, मुख्याध्यापक शिवाजी पारसे, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ , माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा जया गायकवाड , प्रशाला व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षा सोनाली पाटील,माता -पालक संघाच्या अध्यक्षा धनश्री साठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षि, अक्कासाहेब आणि सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली..
पुढे बोलताना अॕड.नितिन खराडे यांनी लहान वयातील विद्यार्थी -विद्यार्थींनीनी ” कृष्णप्रिया कलादालनात” विविध संदेश देणारी रेखाटलेली रांगोळी ,अप्रतिम ,देखण्या कलाकुसरीतुन साकारलेले विविध आकर्षक देखावे-प्रतिकृती आणि मनाला भावणारे ‘मृदगंध’ हस्तलिखित अंकाचे कौतुक करुन बालगोपाळांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
यावेळी प्रशालेच्या शिक्षिका रेखा देसाई यांनी दिपावली सणाचे महत्व सांगुन सणामधील पवित्र संस्कृतीचे दर्शन आपल्या अभ्यासपुर्ण मनोगतामधुन समजावुन सांगितले .तसेच प्रशालेचे सहशिक्षक यशवंत दुधाट यांनी ” मृदगंध”या हस्तलिखितामधील रहस्यांचा हळुवारपणे उलगडा करीत त्यामागील उद्देश सांगितला. मुलांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे कौतुक संस्थेच्या संचालिका निशा गिरमे वहिनी यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.तसेच आपल्या कलाकुसरीतुन साकारलेल्या कलेचे कौतुक करीत पालक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईलाही बागवान यांनी केले तर आभार दत्तात्रय लिके यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका,शिक्षकांनी व जाधव सर,जगताप मामा आणि झुंबर मावशी यांनीही परिश्रम घेतले..