अकलूज(युगारंभ )- राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका अव्वल ठरला असून तालुक्यातील सुमारे ८ हजार ३५० शेतकऱ्यांना ४१ कोटी ७५ लाख रुपयांचा लाभ झाला आहे .
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील १४४ विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माळशिरस तालुक्यातील ८ हजार ३५० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे .
या शेतकऱ्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास सोसायटी कडून घेतलेले कर्ज नियमित व वेळेत फेडल्याने तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने वेळेत कर्ज वसूली दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे .
प्रति शेतकरी ५० हजार रुपये प्रमाणे ४१ कोटी ७५ लाख माळशिरस तालुक्यासाठी मंजूर झाले असून यापैकी ४ हजार ११७ कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर २० कोटी ५८ लाख ५० हजार रुपये जमा झाल्याची माहिती विकास सोसायटी संघटनेचे अध्यक्ष मोहन देशमुख व शंकरनगर विकास सोसायटीचे सचिव अजित पताळे यांनी दिली .
ऐन दिवाळी सणातच शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे .