माळीनगर (युगारंभ )-चाकोरे ता. माळशिरस येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास’ या विशेष श्रमसंस्कार शिबीरात ‘ हास्यानंद ‘ या मनोरंजन आणि प्रबोधनपर कार्यक्रमात देवानंद साळवे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षि काका व आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
विद्यार्थीदशेत मिळालेले अनुभव आयुष्याला सामोरे जाताना उपयोगी पडत असतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून तुम्हालाही नवा अनुभव मिळेल असे सांगत, संस्कार हे आपल्याला मातीशी जोडण्याची काम करत असतात तेव्हा हे संस्कार ज्यांच्यामुळे आपल्याला मिळतात ते आई -वडील, शिक्षक, मित्र यांचा नेहमी आदर करायला शिकले पाहिजे. आपल्या बोलण्यात धन्यवाद व कृपया शब्दांचा वापर करून आपली नम्रता दाखवली पाहिजे.
त्याचबरोबर हसणे हे माणसाला मिळालेले वरदान आहे, तेव्हा प्रत्येक माणसाने हसण्याचा आनंद घेतला पाहिजे. माणूस जन्मापासून मरणापर्यंत अनेक प्रसंगाचा महोत्सव साजरा करत असतो म्हणून माणसाने आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाचा महोत्सव साजरा करावा व प्रत्येक क्षण आनंदाने जगावा असे सांगत बोलण्याची पद्धत, शैली, ग्रामीण भागातील उखाणे, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील गमती जमती , विविध गमतीदार प्रसंग सांगून आपल्या ‘हास्यानंद’ या एकपात्री कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना खळखळून हसविले.
यावेळी उपसरपंच सचिन कचरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रय मगर, डॉ. सज्जन पवार, डॉ. विजय शिंदे, इंदापूर पं. समिती चे शशिकांत करडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत गायकवाड याने केले. सूत्रसंचलन हितेश पुंज याने केले तर आभार समाधान माने याने मानले.