अकलूज(युगारंभ )- विविध गीतांवर थिरकणारे चिमुकले कलाकार, त्यांचे गोंडस, लोभस व गोजीरवाणे हावभाव, वय अंत्यंत कमी असले तरी गाण्याच्या कडव्यांबरोबर नृत्याची चाल बदलणाऱ्या लहान मुलांच्या नृत्य-गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दिलेली साथ पाहताना शिक्षकांनी घेतलेली मेहनतही लक्षात येत होती. येथील स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर आज महर्षि महोत्सवास सुरूवात झाली आणि लहान मुलांमध्ये दडलेले कलाकार अनुभवायला मिळाले.
यशवंतनगर, ता. माळशिरस येथील महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग व लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने महर्षि महोत्सव-2022-23 वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराव शिवपुजे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरिक्षक अरुण सुगावकर, महर्षि प्रशालेचे सभापती अॅड. नितीन खराडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्कर्ष शेटे, नवनाथ पांढरे,मुख्याध्यापक शिवाजी पारसे,जया गायकवाड,केंद्रप्रमुख नष्टे सर,मुख्याध्यापिका वाघ सुनिता .,मुख्याध्यापक संजय गळीतकर, स्थानिक प्रशाला समितीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रचंड संख्येने पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन देवानंद साळवे व इलाही बागवान यांनी केले.
यावेळी डॉ. शिवपुजे म्हणाले, स्पर्धा, महोत्सव किंवा गॅदरिंग काही असो,पालकांनी आपल्या मुलांना त्यामध्ये सहभागी व्हायला लावले पाहिजे. कारण यामुळे मुलांचा बौध्दिक व मानसिक विकास होतो. त्यांच्यातील न्युनगंड नाहिसा होऊन ते कोणत्याही कठिण आव्हानाला तयार होतात.
‘महर्षि महोत्सव’ प्रशालेच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते -पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार यशस्वी झाला.त्यानुसार बाल व कुमार वयातील कलाकारांनी विविध लोकगीत, सिनेगीत , आदिवासी गीत सादर करून ‘हम भी कुछ कम नही’ हे सिध्द केले.
आपल्या मुलांचा नृत्याविष्कार पाहताना पालकांची मने आनंदाने उचंबळून येत होती. त्यांच्या प्रत्येक गीतांना प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात साथ देत होते. अगदीच निरागस असणाऱ्या या लहान मुलांना नृत्याच्या चाली शिकवणाऱ्या शिक्षकांचेही पालक वर्गातून प्रचंड कौतूक होत होते.
