*उत्सव आज तीन रंगांचा सजला,*
*प्रजासत्ताक दिन सोनियाचा आज आला.*
*देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला,*
*अभिमानाने आज तिरंगा फडकला.*

माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.एम के इनामदार यांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.
राष्ट्रगीत, ध्वजगीतांनंतर डॉ. इनामदार यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकाचे निरीक्षण केले. घोषपथकाच्या तालासुरात एनसीसी, आरएसपी व स्काउट गाईडच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन करून संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. या पथकांचे नेतृत्व शौनक कुलकर्णी याने केले. मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये , देशभक्तीपर गीतांचे तसेच संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या लेझीम संघाचे सादरीकरण करण्यात आले. या बहारदार कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून विद्यार्थ्यांसमवेत लेझीम खेळ सादर करून प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. इमानदार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्याध्यापक प्रताप पाटील सर यांनी केलेल्या नियोजनाचे व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी भावी जीवनात संगणकाचे व विविध भाषांचे ज्ञान अवगत करावे असे सांगितले. यानंतर पत्रलेखनातील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त उपशिक्षक तात्यासाहेब काटकर यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, स्थानिक प्रशाला समितीचे इकबाल काझी, पालक संघांचे सदस्य, पत्रकार, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक मुंगसे सर, माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक घंटे सर, उपप्राचार्य शिंदे सर, उपप्राचार्या करंडे मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेत्तर, विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील, पोपट पवार यांनी केले.
वंदे मातरम गीताने कार्यक्रमांची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.