माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज प्रशालेत ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे अकलूज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सुनिल जाधव साहेब उपस्थित होते.तसेच अकलूज पोलिस स्टेशनचे श्री.पांडुरंग जाधव साहेब, प्रशाला समितीच्या सदस्या सौ.कुलकर्णी वहिनी,सौ.जावळे वहिनी, सौ.पिंगळे वहिनी,प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर प्रशालेतील आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी राष्ट्रगीत,ध्वजगीत गायन करून राष्ट्रीय झेंड्याला सलामी दिली. प्रमुख पाहुणे,सर्व विद्यार्थी,शिक्षक व उपस्थित पालक या सर्वांनी संविधान वाचन केले.याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संचलनाचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण करून, सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीचे सुंदर असे प्रात्यक्षिक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम यांनी केले.
प्रताप क्रीडा मंडळ आयोजित समूह नृत्य स्पर्धेत प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला होता त्यानिमित्त प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सहभागी विद्यार्थी कलाकारांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्रमंडळ आयोजित लेझिम स्पर्धेमध्ये प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला होता यातील सहभागी विद्यार्थी कलाकारांनाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आई बाबा दिवस निमित्त प्रशालेने इयत्ता बालवाडी व मोठा गट मधील पुरुष व महिला पालकांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन केले होते.यामध्ये क्रमांक मिळवलेल्या पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
त्यानंतर “शरीर माध्यम खलू धर्म साधनंम” या उक्तीप्रमाणे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचे (पिरॅमिडचे) सादरीकरण करून निरोगी शरीरासाठी व्यायामाची गरज आहे हा संदेश यातुन दिला व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लेझिमचे जोशपूर्ण वातावरणात सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली.आजच्या कार्यक्रमासाठी प्रशालेतील विद्यार्थी कलाकारांनी विविध क्रांतिकारकांच्या वेषभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कु.रेवा सुभाष रणदिवे हिने स्वतःभोवती रिंग फिरवणे या खेळाचे सुंदररित्या सादरीकरण केले. इयत्ता ३ री मधील विद्यार्थी कलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर करुन सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.सुनील जाधव साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्वांना प्रजसत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगतातून उपस्थित सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक श्री.गिरीश सुर्यवंशी सर यांनी केले.शेवटी सारे जहाँ से अच्छा या समुहगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.कार्यक्रम झाल्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.