लवंग (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, सहकाराचा महामेरू सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांची ४४ वी पुण्यतिथी सदाशिवराव माने विद्यालयात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ‘विज्ञान झेप’ व ‘शेतशिवार’ या हस्तलिखित अंकाचे प्रकाशन, गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ व १२ वी विद्यार्थी निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अकलूजचे नामवंत अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. निळकंठ कोरके, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सणस, मनोज रेळेकर यांच्या शुभहस्ते अंकांचे प्रकाशन करण्यात आले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. महर्षी गीत गायनाने सहकार महर्षींना शब्द सुमनांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक प्रताप पाटील सर यांनी सहकारातून समृद्धी निर्माण केलेल्या सहकार महर्षीच्या जीवन कार्याची ओळख करून दिली.
महर्षींच्या पुण्यतिथी निमित्त जनसेवा संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीसांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयाचे भूगोल विषयाचे शिक्षक विश्वनाथ हलकुडे यांना भूगोल प्रज्ञा केंद्र, नवी मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा ‘उपक्रमशील भूगोल शिक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला
यांचबरोबर विद्यार्थिनी कु.धनश्री चव्हाण हिने मुख्याध्यापक प्रताप पाटील सर यांचे काढलेल्या रेखाचित्राचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहकार महर्षीच्या जीवनावर सहशिक्षक मंगेश शिंगाडे यांनी व विद्यार्थीनी भाषणामध्ये कु.गीतांजली माने देशमुख हिने आपले विचार व्यक्त केले. रेवा झांबरे हिने गीत गायन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.कोरके यांनी मार्गदर्शन करताना विज्ञान व शेती यांची सांगड घालून जागतिक समस्यांवर संशोधन करावे असे सांगून १० वी १२ वी विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रशाला समितीचे सदस्य इकबाल काझी, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, सौ.राजश्री करंडे, अंकांचे संपादक धनंजय मगर, राजेंद्र जाधव, बहुसंख्य शिक्षक, शिक्षकेत्तर, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट पवार, राजकुमार पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचा गोड शेवट विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रताप पाटील यांनी सेवापूर्तीनिमित्त दिलेल्या अल्पोपहाराने झाला.