माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत आज स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.विक्रम मगर सर उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी सौ.शकुंतला कुलकर्णी काकी उपस्थित होत्या.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम उपस्थित होत्या. माता-पालक संघाच्या सौ.कथले वहिनी उपस्थित होत्या.तसेच सर्व इयत्ता प्रमुख उपस्थित होते.
प्रास्ताविक कु.जाधव मॅडम यांनी केले.त्याला अनुमोदन कुु.दिपाली निंबाळकर मॅडम यांनी दिले.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सन्माननीय प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी चि.अर्णव कोळेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच चि.आयुष कोरेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आढावा आपल्या खणखणीत आवाजात घेतला.
त्यानंतर “शरिर माध्यमं खलु धर्म साधनमं” या वाक्याप्रमाणे प्रत्येक वर्षीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले.आज या क्रीडा स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.क्रीडा विभागाच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन श्री.किर्दक सर यांनी केले.
तद्नंतर इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवजन्म सोहळा, स्वराज्याची शपथ अशा देखाव्यांचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण करुन उपस्थित सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यामध्ये शहाजीराजे, जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लेझिम चे जोशात सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ते श्री.विक्रम मगर सर यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास,आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडुन काय आदर्श घ्यावा याविषयी आपले विचार भारदस्त आवाजात मांडले.

यावेळी माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन कु.जाधव मॅडम यांनी केले.