‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते!’
“या ओळी पहिल्यांदा कानी पडल्या अन् सुरु झाला प्रवास… पुढचं त्याच्या पुढचं आणि न वाचलेलं मागचंसुद्धा बरचसं शोधण्याचा…, कारण या ओळी पहिल्यांदा ऐकल्या त्या आनंद अन अस्वस्थता या द्विधा मनःस्थितीतच, पण अस्वस्थेपेक्षा आनंद खचितच जास्त होता.! काहीसं वेगळं मिळाल्याचा…..या दोन ओळीनं पुढील अनंत प्रवासाची दारे किलकिली केली आणि या रसात आपणही भिजावं असं ठरलं. या ओळी ‘सहज, सोप्या, सुंदर, विलोभनीय, अप्रतिम’ अशी आपल्याला ज्ञात असलेली बरीचशी विशेषणं लावली तरी चालतील इतपत ‘भारी’ आहेत. पण ज्या वयात ऐकल्या ते वय कविकल्पनांचे, मनोराज्य रचण्याचे होते पण या ओळी वाचून वाटलं… अगदी आत कुठेतरी सललेलं, रुतलेलं त्यात उमटलं आहे आणि या ओळी मनाला अक्षरश: भिडल्या खूप खोलवर….”
माझ्या मनीचे हे विचार, त्यातील दाहकता अन आयुष्य- मरण यावर प्रेम करण्याचं भाबडं वय. हे सारं लिहणारा कवी व त्याच्या कवितांचा शोध सुरु झाला अन् नाव सापडलं ‘गझल मेरुमणी- साक्षात् सुरेश भट’ ‘एल्गार, रुपगंधा, झंझावत, रंग माझा वेगळा’ ही सारी संपदा वाचण्याचा सपाटा सुरु झाला अन् मराठीतील अलौकिक खजिना मिळाल्याचा, वाचल्याचा अन् जगल्याचा जो स्वर्गीय आनंद होता, तो ‘याचि देही, अन याचि डोळा’ प्राप्त झाला. आतापर्यंत हिंदी कविता, चारोळ्या, शेर, गझल हे वाचण्याचा छंद होता, मराठीतही असचं थोडफार चालू होते पण…, हा ‘पण’ खरचं महत्त्वाचा बरं.
‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,
माझियासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा ।’
किंवा
‘ एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले,
‘राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !’
असा हा ‘गझल’ प्रकार मराठीत आहे आणि तो सुरेश भटांनी इतका समृद्धं करून ठेवलाय हे ‘गहजब ‘ आणि आपण त्यापासून वंचित राहिलो हे थोडसं वाईटच होतं. पण, जेवढं मिळालं ते इतक तृप्त करणारं होतं की’ निसटलेलं’ लक्षातचं राहिलं नाही. कारण या ‘गझल’ विषयी पु.ल.देशपांडे असे म्हटले होते- “गझल हे केवळ वृत्त नसून, ती एक वृत्ती आहे; एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे ” तर अशा नितांतसुंदर ‘गझले ‘ला आपल्या लेखनीने शृंगारण्याचं काम सुरेश भटांनी केलं. त्यांनी ‘गझल पहिली’ या लेखात असे म्हटले आहे की- “कविता लिहिता -लिहिता मी कवितांची कविता म्हणजे गझल लिहू लागलो.” वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून साधारणतः १९४४ पासून भट कविता करू लागले होते. १९५७ मध्ये ‘ शेवटी’ ही त्यांची ‘पहिली’ गझल होती,
त्यांनी वास्तवाला भिडणारी समाजातील संघर्ष, व्यवस्था यांविषयी भाष्य केले-
‘तलम माणसांनी घ्याव्या कागदी भराऱ्या ,
उद्या वाळवी साऱ्यांना लागणार आहे.’
या ओळी वाचतानाच डोक्यात चक्र फिरू लागतात, प्रामाणिक, सभ्य माणूस ‘तलम’ तर अपप्रवृत्ती, कुसंस्कार म्हणजे ‘वाळवी’. हे सारं कविचा दृष्टिकोन किती प्रगाढ व प्रगल्भ होता याचीच प्रचिती देणारा ठरला. अन् हा कवी ‘भाव’ खाऊन गेला.
‘जिवंत माझ्या कलेवराला अजून आयुष्य हाक मारी,
कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकारी।‘
या जगातील सर्व सुखे एकीकडे व स्वत: कवी एकीकडे असा प्रवास असणाऱ्या वरील ओळी किंवा प्रेमाच्या प्रथमावस्थेतील ‘त्या’ची, ‘ती’ची अवस्था असो –
‘ का तुला सोडवे न गाव तुझे ?
मी मला सोडले तुझ्यासाठी!’
किंवा
‘तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही,
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते।‘
या द्विपदी असो, वाटतं अगदी प्रत्येकाच्या मनातलं, अंतरंगातलं लिहलयं भटांनी.पण प्रश्न पडायचा हे भटांना कळलं कसं? हे आपणा सर्वांना उमजत असतं पण शब्दात मांडायचे सामर्थ्य प्रत्येकातच असते असे नाही. सुरेश भटाचं हे लिहणं म्हणजे ‘सामाजिक कोलाहालाचे भान, तरुणांच्या ओठीचे गान अन् ताठ कणा,ताठ मान.’ ज्या वयात आम्ही दुसऱ्यांच्या कविता स्वतः च्या नावावर खपवायचो, त्याच वयात आम्हाला हा ‘पेटंट’ कवी भेटला. त्यांच्या कविता, गझल आम्ही थोड्याफार बदलून स्वत: च्या नावावर खपवू लागलो:-
“दिलास तूच मला,तूच हा रिता पेला,
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!”
अशा प्रेम, विरह धुंदी देणाऱ्या गझल वाचल्या की आपणही या कवी व कवितांवर केव्हा प्रेम करू लागतो हे समजत नाही- परंतु नुसतं प्रेम करत राहणं… इतके प्रेमळ सुरेश भट कदाचित नसावेत. त्यांनी जेवढे अलवार प्रेमाच्या भावनांना फुंकर घातली तेवढेच समाजातील वेगळेपण आत्मभान यांवर कठोर भाष्य केले.
“मी रंग पाहिला त्या मुर्दाड मैफलीचा,
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!”
असे असो किंवा आपल्याच लोकांच्या दगाबाजपणाबद्दल म्हणतात-
“मेल्यावरी जगाचे आभार मानले मी,
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी !
आयुष्य संपताना इतकीच खंत होती,
काही भिकारड्यांना दिलदार मानले मी “
सुरेश भटांनी हे सारं सारं लिहलंय ते केवळ ‘आपल्यासाठी’ व ‘आपल्यांसाठी’ असचं वाटत होतं.
‘आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रु ढाळलेस का तेव्हा ?,
हे तुझे मला आता वाचणे सुरु झाले,
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा? ‘
या ओळी वाचल्या की एखादयाच्या प्रेमभंगाचं दु:ख सुद्धा हलकं वाटावं इतक्या तरल ओळी भटांनी लिहिल्या आहेत.
एका चित्रपटात असं ऐकलं होत की – ‘प्रेमात पडण्यापूर्वी किशोरचं गाणं, प्रेमात पडल्यावर मोहम्मद रफीचं आणि प्रेमभंग झाल्यावर मुकेशचं गाणं ऐकावं.’ पण, मराठीत ही तीनही क्षेत्र समर्थपणे पेलण्याचं आणि समस्त रसिक व ‘प्रेमळ’ माणसांना कृतकृत्य करण्याचं सामर्थ्य भटांनी दाखवलं आहे.