अकलूज (युगारंभ )-माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय सांगोला या उपक्रमशील शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन ( कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची 111 वी जयंती) मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर नेहमीच अग्रेसर होते. देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी खूप काम केले होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निमित्ताने मराठी भाषेचा गौरव करण्याचेही राज्य सरकारने योजिले.
हाच गौरव सोहळा उत्कर्ष विद्यालयामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या सोहळ्याची सुरुवात सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता चि. पुष्कर लोणारकर (एलिझाबेथ एकादशी फेम) याच्या शुभहस्ते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावर्षीच्या मराठी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रज लिखित ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘ या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले. या राज्यगीताचे गीतगायन उत्कर्ष विद्यालयातील उत्कर्ष कलामंचच्या विद्यार्थ्यांनी, विद्यालयाच्या संगीत शिक्षिका शुभांगी ताई कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
यानंतर इयत्ता नववी मधील कु. सानवी प्रवीण गायकवाड हिने कार्यक्रमाचे प्रयोजन आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे श्री पुष्कर लोणारकर तसेच त्यांचे माता-पिता श्री. व सौ. लोणारकर यांची ओळख इयत्ता नववीतील कुमारी स्वरदा वांगीकर हिने करून दिली.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी केले.
उत्कर्ष विद्यालयातील बालसाहित्यिकांनी तयार केलेल्या ‘ उन्मेष या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर हस्तलिखिताचे लेखन, संपादन, मांडणी सजावट इत्यादी सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी केल्या.
हस्तलिखित प्रकाशन सोहळ्यानंतर इयत्ता नववी मधील कु.जुई रणजीत केळकर, दिबा समीर मणेरी व स्वरदा श्रीपाद वांगीकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझे माहेर वाघदरा ‘ या कथेचे नाट्य अभिवाचन सादर केले.
मराठी चित्रपट अभिनेता पुष्कर लोणारकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व पटवून देताना, भाषेचा गोडवा अमृता पेक्षाही श्रेष्ठ आहे. आपण हा गोडवा टिकवला पाहिजे. जपला पाहिजे. यासाठी सर्वांनी वाचनाचे महत्त्व जाणून भरपूर वाचन करा. मराठीतील वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा अभ्यास व प्रसार करा. असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाला संस्थाध्यक्षा मा. संजीवनीताई केळकर, संस्था कोषाध्यक्ष शालिनीताई कुलकर्णी तसेच संस्थापदाधिकारी मा. दमयंतीताई खर्डीकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई, उपमुख्याध्यापिका स्वरालीताई कुलकर्णी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीता कुलकर्णी, पर्यवेक्षक मिसाळ सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यवाही इयत्ता नववीतील सर्व विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील ऋषी भारत पैलवान व दिबा समीर मणेरी यांनी केले तर आभार जुई रणजीत केळकर हिने मानले.