माळीनगर (युगारंभ )-पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्रख्यात साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस”जागतिक मराठी भाषा दिन” म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या मराठी विभागाने यानिमित्त “लेखक आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखक व पत्रकार मा. महावीर जोंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. पी.सातव हे होते.
मराठी विभागप्रमुख डॉ. महादू बागुल यांनी प्रास्ताविक केले.प्रा.डॉ. शोभा तितर यांनी मा.महावीर जोंधळे यांची मुलाखत घेतली. आपल्या घडण्याचा प्रवास स्पष्ट करताना ,” वि.वा.शिरवाडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. इंदिरा संत, शांताबाई शेळके, ग. दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, ग्रेस इ. मान्यवरांच्या सानिध्यात आल्यानंतर लेखक म्हणून घडणे शक्य झाले. मात्र त्यासाठी झपाटून जाणे हा स्वभाव झाला पाहिजे. संतांचा रोज एक अभंग समजून घेतला तर जगणे समृद्ध होते. शाहिरांनी धमण्यातली रग जिवंत ठेवण्याचे कार्य केले. बहिणाबाईंची कविता आयुष्याचा अर्थ सांगते. म्हणून नव्या पिढीने वाचनाकडे जाणीवपूर्वक वळले पाहिजे. आभासी जगात हरवून जाण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात डोकवा. अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास घ्या. ” असे ते म्हणाले. आपल्या सहजीवनाची हकीकत सांगताना महिन्याला पैसे नको , सोने नको, पण पुस्तके पाहिजेत असे सांगणारी जीवनसाथी मिळाली, असेही ते म्हणाले.
मा. प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी “विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे, अधिकाधिक पुस्तके आणून ग्रंथालय समृद्ध करण्यावर भर दिला जाईल. मात्र चांगले वाचकही घडले पाहिजेत. “असे आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.
सूरज शिराळे याने आपल्या कवितेचे सादरीकरण केले. श्रावणी कोंढेकर हिने नृत्यातून गणेश वंदना सादर केली.
विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला आय क्यू ए सी समन्वयक डॉ. सपना राणे,डॉ. मेघना भोसले,डॉ. सुनीता डाकले ,व सर्व प्राध्यापक , विद्यार्थी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी या दिवशी महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून हा दिवस साजरा केला.