पुणे (युगारंभ )-“उत्कृष्ट मराठी लिहिणे, वाचणे, बोलणे सहजतेने घडावे. आज व्हॉट्सॲप मराठीचा वापर वाढला असून मराठीतील चांगल्या साहित्याच्या वाचनापासून विद्यार्थीवर्ग दुरावत चालला आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे.” ” वाट ” या आपल्या कथेच्या पटकथेचे सादरीकरण करून एक ते दीड तास विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारे युवा पटकथाकार, सहायक दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कोरवी ” पटकथालेखन ” या विषयावर बोलत होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत मराठी विभागाने आयोजित केलेली ” लेखन कौशल्य ” या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , मराठी अभ्यास मंडळ सदस्य डॉ. संदीप सांगळे यांनी ” व्यावहारिक व उपयोजित मराठी लेखनकौशल्ये “या विषयावर मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी नवमध्यामांतील विविध व्यावसायिक संधीची विद्यार्थ्यांना ओळख झाली पाहिजे असे सांगून कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.
” मन नावाचं आभाळ पुन्हा दाटून आलं ,
हृदय नावाच्या शिवारात,
भावनांचा पाऊस बरसू लागला.”
या व इतर काही कवितांचे सादरीकरण करून गिरीश कोरवी यांनी विद्यार्थ्यांना साहित्यातून भावनांची अभिव्यक्ती होते याचा प्रत्यय दिला. मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले कोरवी सध्या नागराज मंजुळे यांच्या घर, बंदूक, बिर्याणी या चित्रपटात सहायक दिग्दर्शक व अभिनेते म्हणून काम करत आहेत. त्यांनी मालिका व चित्रपटांसाठी पटकथा लेखन कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. संदीप सांगळे हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आपली पत्रकार म्हणून जडणघडण महाविद्यालयीन जीवनात झाली हे सांगून माध्यमांमधील लेखनकौशल्यांबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अभ्यास मंडळवर निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार मा. प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.मराठी विभागप्रमुख डॉ. महादू बागुल यांनी प्रास्ताविक केले.मराठी ही आज जागतिक स्तरावरील महत्वाची भाषा असून भाषिक कौशल्ये आत्मसात केल्यास विविध व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत, असे या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. शोभा तितर म्हणाल्या. डॉ. तितर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मराठी विभागाच्या विद्यार्थिनी श्रुती जोशी यांनी ईशस्तवन केले.विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आदिनाथ पाठक यांनी विद्यार्थी विकास मंडळाची भूमिका व्यक्त केली व आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेला अभिनेते अभिजीत पवार , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे,डॉ. सुनीता डाकले,डॉ. मेघना भोसले , विविध विभागांचे विभागप्रमुख ,प्राध्यापक,पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.