“उत्कट भावनांचा शब्दाविष्कार म्हणजे कविता-” असे कवितेचे वर्णन वर्डस्वर्थ यांनी केले आहे..
कविता जितकी वाचायला आणि म्हणायला सोपी… तितकीच ती लिहायला आणि समजायला अवघड,.
परंतु कविता जगणं हा प्रत्येकाचा एक नवा अनुभव असतो….
म्हणजे जसा पाऊस एकसारखा असून प्रत्येकाचं भिजणं वेगवेगळं असतं….
तसं कविता एकच असून प्रत्येकाच्या बघण्याची दृष्टी आणि कविता जगण्याची उर्मी वेगवेगळी असते….
असाच एक कवी – की जो बोलता बोलता लिहायला लागला… मग स्फूटलेखन करीत लघुकथा लिहू लागला… विनोदी कथांचे लेखन करता करता… चारोळीचे बोट पकडुन हा मित्र कवितेच्या प्रांतात मुसाफिरी करू लागला…
दिसलेलं पुस्तक आणि मस्तक वाचू लागणारा हा मित्र… कधीकाळी विद्यार्थ्यांत रमणारा हा मित्र… शब्दांना जेव्हा बोलू लागतो .. तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द.. नव्याने जगू लागतो… वाचणाऱ्या प्रत्येकाला बोलू लागतो…
आज जागतिक कविता दिवस… त्यानिमित्त…
महाराष्ट्रभर ज्यांच्या लेखणीने, कवितांनी चौफेर प्रवास केला… असे कविवर्य मंगेश मोहन पोरे यांच्या काव्याचा हा आस्वाद आपणाला नक्कीच आवडेल यात शंका नाही…
आव्हान…
हे नियंत्या..
किंवा निर्मिका..
किंवा काहींनी मानलेल्या बापा..
तू जर खरंच जग चालवत असशील
किंवा कुठं वास करत असशील..
किंवा जागृत असशील…
तर मी जिवंत असेपर्यंत,
काहीही जादू कर..
“मला एकदा तरी ‘आस्तिक’ बनव..!”
पावसाळलेल्या मनाला ग्रीष्मातली एक जुनी याद……
रिमझिम पडून मातीमध्ये झिरपत जातो पाऊस
थोडा जास्त अंगामध्ये उतरत जातो पाउस..
मातीच्या अंगणामध्ये नक्षी कोरत जातो पाऊस
धरणीला पाण्यामध्ये ओढत नेतो पाऊस..
थेंब-थेंब आपुला वाटत जातो पाऊस
रडता-ओरडता स्वतः, सर्वांना हसवत जातो पाऊस..
जमिनीत बिजाला कुशीत घेतो पाऊस
सैल करुन त्याला,जिणं उगवत ठेवतो पाऊस..
असा सर्वांमध्ये लुसलुसत मिटतो पाऊस
तुझ्या वाटेकडे डोळे,मुसमुसत राहतो माणूस!
येऊ नका सग्यांनो, तिथे चौकशीस माझ्या…
मरताना तरी मला रे,सुखाने मरु द्या!
तो विजयस्तंभ पाडुनी टाका गवंड्यांनो,
कित्येक वर्षे ह्या राजाने युद्ध खेळले नाही!
आम्हां नको गजरा, अशा सुगंधी फुलांचा
भ्रमराने स्पर्शून ज्याला,एकदाही छळले नाही!…
मी प्रेमपत्रे लिहिली तुला खूप..
पण त्यावर तुझं नाव लिहिण्याचा ‘आळस’ केला…
आज तुझ्या लगीनचिट्ठीवर…
‘कार्यवाहक’ म्हणून माझं नाव छापून…
तुझ्या बापाने त्यावर ‘कळस’ केला…!!😜😛😛
••माझी नवी ‘कविता’…..
“तुझे बोलके डोळे…!”
दिसतेस तू साक्षात
अथवा चित्रांतुनी,
पाहतेस नाजूकसे अन्
बोलतेस डोळ्यांतुनी….
तू राहिलीस ‘अबोल’ ,
तरी ‘डोळे’ सर्व काही बोलतात,
तुझ्या अंतरीचे भावतरंग
तुझ्याही नकळत खोलतात…..
असतेस आनंदी वा खट्याळ मनामधुनी,
न बोलता दाखवतेस,
मात्र एका कटाक्षामधुनी…..
तुझे डोळे कोजागिरी चांदणे
वा शुक्राचे हसणे,
त्यात उमलते इंद्रधनू ,
तर कधी बेकरारी रुसणे…..
काळ्याभोर बाहुलीत कधी दिसतो या रम्य विश्वाचा डोह,,
तरंगत तुझ्या मृगचक्षूंवरती,होतो एकटक पाहण्याचा ‘मोह’…!!
पोेचवलेत निरोप सर्वांना माझ्या पराभवाचे…
आज मी जिंकल्याचा निरोप मजलाही नाही..
इतक्यात नका करु चर्चा माझ्या पराभवाची……
तलवार उशाशी घेऊन मी अजून झोपलेलो नाही….!
आज आहे इथे, उद्या मी असणार नाही.. तुमच्या खोट्या आवतनाला ,सारखे फसणार नाही..
साभार -मंगेश पोरे (सांगोला )