अकलूज (युगारंभ )- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित ; महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे हसत खेळत बुद्धिविकास या बालसंस्कार वर्ग व उन्हाळी शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमाची देखील गरज असते. या उद्देशाने सुरू झालेले हे सात दिवसीय शिबिर विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकवून गेले. दिनांक 11 एप्रिल पासून 17 एप्रिल पर्यंत या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान,संस्कार, संगीत, क्रीडा, कराटे, कला, विज्ञान आणि मनोरंजनासह अनेक गोष्टी हसत खेळत शिकविण्यात आल्या.
शिबिराच्या समारोपादिवशी विद्यार्थ्यांनी आपले स्वानुभव सांगत या शिबिरातून बऱ्याच गोष्टी शिकल्याचे सांगितले. तसेच उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत दरवर्षी हा उपक्रम राबवावा या सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक पारसे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व कृतिपुस्तिका देण्यात आल्या. तसेच शिबिराचे मार्गदर्शक देवानंद साळवे सर यांचा सत्कार पारसे सर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिबिरार्थी, पालक सर्व शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्राणायाम, संस्कार गोष्टी, कृतीयुक्त गीते, भाषिक खेळ, अबॅकस, भावनांची ओळख, कृतीवरून वाक्य ओळखणे, रिले ड्रॉईंग, दुसऱ्याचा अंगरखा, कराटे, टॅनिग्राम, कविता तयार करणे, समूहगीत गायन, कागदापासून दागिने बनविणे, कवितांना चाल लावून संगीत देणे, गोष्ट तयार करणे, कागदावरील नृत्य,खजिना शोध अशा नानाविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेच्या सभापती कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उन्हाळी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कार अभ्यासाबरोबरच खेळ यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने माणूस म्हणून घडत असताना प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव शोधून काढणे गरजेचे असते. अशा प्रकारचे एकमेव शिबिर तालुक्यात असून यापुढेही असे उपक्रम राबविण्यास आम्ही कटिबद्ध असू.
मुख्याध्यापक- शिवाजी पारसे सर