अकलूज(युगारंभ )-निलांबिका लिंगायत महिला मंच नातेपुते यांचे वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच प्रा. देवानंद साळवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अशा विविध उपक्रमांनी बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर यांची आरती प्रशांत सरूडकर यांच्या हस्ते संपन्न झाली तर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख व्याख्याते प्रा. देवानंद साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
विठ्ठल मंदिर परिसर नातेपुते या ठिकाणी समस्त महिलावर्गांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करीत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रा. देवानंद साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
व्याख्यानात प्रा. देवानंद साळवे म्हणाले, ‘धार्मिक अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला आपल्या उपदेशातून संजीवनी देण्याचे महत्कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले आणि दुसऱ्यांना शहाणे करणे यासारखे अध्यात्म नाही असे सांगत दुसऱ्याचे दुःख दूर करणे यासारखा धर्म नाही अशी शिकवण दिली. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. प्राचीन धर्मग्रंथ हे प्रमाण नाहीत, स्त्रियांनासुद्धा समानतेचा हक्क आहे. फक्त देवळात देव शोधण्याची गरज नाही तर बसवेश्वरांनी प्रत्येकाच्या हृदयात देव आहे असे सांगितले.श्रमातूनच कैलास प्राप्ती होते, असे बसवण्णांनी लोकांना हितोपदेश करून, मानवतावादी आणि समतावादी लिंगायत विचार सांगितलाआणि त्याचा प्रचार व प्रसार केला.
कार्यक्रमास निलांबिका महिला मंचच्या अध्यक्षा गिरिजा पावटे, उपाध्यक्ष उमा होडगे, विजया सरूडकर, प्रियंका शेटे, स्वप्ना शेटे, योगिता कथले, अर्चना सरूडकर, सुमती गटगूळ, ज्योती कडबाने, सुप्रिया चिंचकर, संगीता गटगूळ, सुप्रिया गटगूळ, सुजाता मुंजी, अर्चना गटगूळ, जयश्री भंद्रे, रेखा म्हामणे, महादेवी गटगूळ, स्नेहल डोंबे आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिवरुद्र कथले, समर्थ बिडवे यांनी केले.या समारंभास परिसरातील बसवप्रेमी उपस्थित होते.