माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित ; महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर ता. माळशिरस येथे बालदिंडी -पालखी सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर शेलार सर, मुख्याध्यापक शिवाजी पारसे सर, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पालवे, श्री व सौ.रेळेकर, सोनाली पाटील उपस्थित होते.
आषाढीनिमित्त पंढरपूरलला जाणारी संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूज शहरातून जाते .या सोहळ्यानिमित्त यशवंतनगर येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-माऊली-तुकाराम असा जयघोष करीत बाल वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. या आनंदमेळ्याने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. सावळ्या विठुरायाची आस मनी घेऊन छोटी वारकरी मंडळी विठुरायाच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती. टाळ-मृदुंगाच्या साथीने त्यांचा सुरू असलेला विठ्ठल नामाचा गजर शालेय विद्यार्थ्यांनाही आकर्षित करतो.वारकरी व संत-महात्म्यांच्या वेशभूषेतील बालकांच्या खांद्यावर छोटेखानी पालख्या, हातात टाळ व भगवे ध्वज व मुखातून सुरू असलेल्या विठ्ठलाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले. बाल वारकऱ्यांच्या या उत्स्फूर्त विठ्ठलभक्तीला पालकांचीही दाद मिळाली.

विद्यार्थ्यांच्या बालदिंडीतील वारकऱ्यांनी शाळेच्या प्रांगणात उभे रिंगण धरले. या वेळी दोन अश्व रिंगणातून फिरवण्यात आले . टाळ-मृदुंगाच्या साथीत हरिनाम व विठ्ठलाचा सुरू असलेला गजर तसेच बालकांच्या, शिक्षकांच्या व पालकांच्या रंगलेल्या झिम्मा-फुगडीने वातावरण दुमदुमून गेले. बालक स्वरुपातील विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर-टोपी-पांढरा शर्ट, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या मुलांचा रिंगण सोहळा खूपच रंगला. दिंडीतील मुलांनी संत तुकाराम, पांडुरंग, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, संत मुक्ताबाई अशा विविध वेशभूषा केल्या होत्या.
टाळ-मृदुंगाचा साथीत विठू नामाचा गजर करीत शाळेच्या परिसरातून ही दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये टोपी-पांढरा शर्ट घातलेले व कपाळी गंध-बुक्का लावून हाती भगवी पताका घेऊन सहभागी झालेले मुले लक्ष वेधून घेत होते.दरवर्षीप्रमाणे विसाव्यासाठी बाळासाहेब मगर सर यांच्या निवासस्थानी सर्व बालवारकऱ्यांना डिंक लाडुचे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकही दिंडीत सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात आल्यानंतर रेळेकर व मित्रपरिवार यांच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गायकवाड यांनी तर प्रास्ताविक सुषमा काशीद यांनी केले. तर आभार यशवंत दुधाट यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री भोसले, मुलाणी,राजगुरू, लिके, बागवान, जाधव, साळुंखे, कदम, साळवे या शिक्षकांनी तसेच गोडसे, गुंड, शेख या शिक्षिकांनी व सर्व पालकांनी परिश्रम घेतले.
