माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत दिंडी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम व सर्व इयत्तांचे प्रमुख तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशालेतील संगीत शिक्षक श्री.अजिंक्य नवगिरे सर यांच्या शुभहस्ते पालखी पूजन,प्रतिमापूजन,वारकरी संप्रदायातील व अभिरूप पात्र साकारणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत मुक्ताई यांचे पूजन करण्यात आले.
यानंतर प्रशालेतील संगीत शिक्षक श्री.नवगिरे सर यांनी “ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी” हा अभंग सादर केला.तसेच सर्व विद्यार्थी,शिक्षक शिक्षिका यांनी विठू नामाचा गजर करत प्रशालेचा परिसर दुमदुमला.यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत उपस्थित होते.
तसेच समावि प्राथमिक विभाग-प्रतापसिंह चौक-महर्षि चौक-सदुभाऊ चौक- समावि प्राथमिक विभाग अशी पालखीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी वारकरी वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या दिंडी पालखी सोहळ्यात प्रशालेचे इयत्ता ३ री व ४ थी चे ९०० विद्यार्थी व शिक्षक – शिक्षिका हरिनामाचा गजर करत सहभागी झाले होते.
शेवटी प्रशालेच्या प्रांगणात अतिशय उत्साहाने गोल रिंगण सोहळा घेण्यात आला.त्यामध्ये प्रथम पताका,तुळस,टाळकरी, विणेकरी तसेच धाव,फुगड्या, अभंग,भजन करून विद्यार्थ्यांनी रिंगणाचा आनंद घेतला आणि पालखीची आरती करून पसायदानाने पालखी सोहळ्याची सांगता झाली.
सर्व छायाचित्रे -कादर शेख (फोटोग्राफर)
सदर पालखी सोहळ्यास प्रशालेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रदीप मिसाळ सर यांनी केले.