लवंग (युगारंभ )- अकलूज येथे संपन्न झालेल्या ग्रीन बेल्ट या कराटे स्पर्धेमध्ये लवंग ता. माळशिरस येथील कु. तृप्ती पोपट गेजगे हिने सुवर्णपदक मिळवत कराटे स्पर्धेत यश संपादन केले आहे.
इयत्ता दहावी मध्ये शिकणारी हनुमान विद्यालय लवंगची ही विद्यार्थिनी. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल. परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत यशच मिळवायचे अशी मनाशी खुणगाट बांधून ती या स्पर्धेत उतरली होती.
तृप्ती हिने नुकतेच पुणे जिल्हा असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवले आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर (रजी ) तर्फे आयोजित सांगोला येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत तिने सुवर्णपदकही मिळवले होते.
तायक्वांदो, वुशु, किक बॉक्सिंग, कराटे इ. प्रकारात तिने यश संपादन करून प्राविण्य प्राप्त केले आहे. तृप्ती दररोज सकाळी सात किलोमीटर सायकल चालवून माळीनगर येथील MMA PK फायटिंग क्लब तेथे सरावाला जाते. तेथून 11 ते 5 वा पर्यंत शाळा व पुन्हा माळीनगर येथे सरावाला जाते. अशाप्रकारे दररोज 20 किलोमीटर सायकल चालवुन तिची शाळा व कराटे सराव दोन्ही चालू आहे. वयाच्या बाराव्या वर्षी पासून ती या क्रीडा प्रकारांचा सराव करत आहे. प्रीतम कांबळे माळीनगर यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.
तृप्तीचे वडील पोपट गेजगे म्हणतात, गावातील बरेचसे लोक मुलीला एवढे शिकवू नको, मुलांसारखे लाड करू नको असे सांगत असताना देखील मी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केला नाही. तिच्या प्रत्येक यशात – अपयशात मी पाठीशी राहणार आहे.
लवंग परिसरात अशा प्रकारचे प्राविण्य मिळाल्याबद्दल तृप्ती व तिचे पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आजच्या युगात प्रत्येक मुलगी स्वतंत्र व निर्भय झाली पाहिजे. स्वसंरक्षणाचे धडे प्रत्येक मुलीला आले पाहिजेत. आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करीत नावीन्याचा ध्यास घेतला पाहिजे. मला पुढे जाऊन देशहिताचे काम करायचे असून भारत मातेची सेवा करण्याचे स्वप्न आहे.–तृप्ती गेजगे