माळीनगर (युगारंभ )- लंपी रोगाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने लंपी आजारावरील लस मोफत केली आहे. परंतु माळशिरस तालुक्यात पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी व्हेटरनरी डिप्लोमा केलेल्या खाजगी व्यक्तींना लस टोचण्याचे काम दिले आहे. हे खाजगी लोक शासनाच्या अधिकाऱ्यांशी मिलीभगत करून शेतकऱ्यांकडून मोफत लसीकरीता पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडून लंपी संदर्भात लसीची मागणी केली जाईल त्यांना पशु वैद्यकिय विभागाकडून तातडीने मोफत लस पुरवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. माळशिरस तालुक्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. दुध उत्पादनामध्ये माळशिरस तालुका अग्रणी असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात जर्शी किंवा देशी जनावरे दिसतात. जनावरांची संख्या मोठी असली तरी त्यांना सेवा देण्यासाठी माळशिरस तालुक्यात जनावरांच्या सरकारी डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. यामुळे तालुका पशुवैद्यकिय विभागाने शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी खाजगी व्यक्तींची मदत घेतली आहे.
लंपीची लस देण्यासाठी येणारे हे खाजगी डिप्लोमा होल्डर डॉक्टर शेतकऱ्यांकडून पैसे घेताना दिसतात. अगोदरच पाऊस नसल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती उद्भवली आहे. चाऱ्याची कमतरता झालीय. जनावरे सांभाळावी किंवा सोडून द्यावीत असा आणीबाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच तालुका पशुवैद्यकिय विभागाने सांभाळलेले खाजगी डॉक्टर शेतक-यांकडून लुट करत आहेत. लंपीची लस देण्यासाठी शेतकऱ्यांकडून बळजबरीने पैसे वसुल केले जात आहेत.
सदरची बाब शेतकऱ्यांनी माळशिरस तालुका पशु वैद्यकिय अधिकारी, उप आयुक्त सोलापूर यांच्या कानावर घातली तेव्हा या अधिका-यांनी सांगितले की, माळशिरस तालुक्यात पशुधन खुप आहे. परंतु डॉक्टरांची कमतरता असल्याने आम्ही खाजगी व्यक्तींची मदत घेतो. या खाजगी व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असल्याचे यांनी मान्य केले आहे. सदरची बाब येत्या ७ तारखेला सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे सांगणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यात पशुधनासाठी जिल्हा परिषदेचे ३१ दवाखाने, राज्यशासनाचे १४ दवाखाना आहे. यामध्ये १९ पशुधन विकास अधिकारी व १२ पशुधन पर्यवेक्षक काम करतात. तालुक्यात १ लाख ४३ हजार जनावरे आहेत. त्यापैकी १२० जनावरे लंपी आजाराने बाधीत आहेत.
तर कारवाई करू….
आमच्याकडून नेमणुक करण्यात आलेल्या खाजगी डिप्लोमा होल्डर व्यक्तींनी जर शेतकऱ्यांकडून पैसे उकळले असतील तर आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू, अशा खाजगी व्यक्तींना आम्ही प्रती जनावर ५ रुपये मानधन देत आहोत. या व्यक्तींनी लंपीची लस मोफत टोचायची आहे. त्यांनी कोणाकडूनही पैसे घेऊ नयेत अशा आमच्या सख्त सुचना आहेत. –डॉ. भास्कर पराडे (सहाय्यक आयुक्त पशु चिकित्सालय)
शनिवारी राञी 7-30 वाजता एक माणूस आमचे घरी आले व ते म्हणाले बागेवाडी येथील पशूवैधकिय अधिकारी डाँ वाघमोडे यांनी लंपी लस देण्यासाठी पाठवले आहे .त्यावेळी त्या अनोळखी माणसाने आमच्या जणावरास लंपी लस देऊन रोख पैसे मागितले व पैसे घेऊन गेले.-फुलाबाई लक्ष्मण लावंड
पशू पालक (गिरझणी )ता.माळशिरस
माळशिरस तालुका पशू वैधकीय अधिकारी डाँ प्रविण शिंदे यांना फोन लावला असता ते म्हणाले मी मिंटीग मध्ये आहे राञी बोलतो
-डाँ प्रविण शिंदे
माळशिरस तालुका पशू वैघकिय अधिकारी.
माळशिरस तालुक्यातील लंपी झालेल्या जनावरांना मोफत उपचार करणार असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले परंतु पशुवैद्यकीय अधिकारी हे लसीकरणासाठी उघडपणे पैसे घेत आहेत ते त्यांनी तातडीने थांबवावे अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने विखे पाटील यांना जाब विचारणार .-
राहुल बिडवे (शेतकरी संघटना)