माळीनगर – सर्जाराजाचा बैलापोळा साजरा करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. आज गुरुवारी बैलपोळा असल्यामुळे लवंग ता. माळशिरस परिसरातील दुकाने विविध साहित्याने सजली आहेत.
बैलपोळा आज साजरा होणार आहे. बैलांना व इतर जनावरांना सजविण्यासाठी तसेच त्यांच्या अंगावर घालण्यासाठी लागणारे झुल, घंटी, घूंगर, पैंजण आदी साहित्यांना आज मागणी होती. दोर, मोरकी, गोंडा, झुल, पितळीकडी, भोरकडी, घंटी पितळी, लोखंडी घंटी बाजारात उपलब्ध आहे.
गतवर्षीपेक्षा 10 ते 15 टक्के दरवाढ बैलपोळा साहित्यामध्ये झालेली आहे. पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे लोकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सण तोंडावर आला तरीही लोकांची खरेदीसाठी अजूनही म्हणावी अशी गर्दी नाही.
– युवराज भिलारे (दुकानदार)
बैलांना पारंपारीक पध्दतीने सजविले जाते. मात्र यंदा प्रथमच फॅन्सी प्लास्टीकच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यात विविध प्रकार आहेत. नवीन प्रकारात गोफ दहा प्रकारात आहे. याशिवाय पैंजणही आहे.
परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकरी, पशुपालक व दुग्ध व्यावसायिक यांची आर्थिक गणिते जुळवताना तारांबळ उडताना दिसत आहे. अशात पुन्हा एकदा लंपी आजाराने डोके वर काढले आहे. तरीही प्रत्येक शेतकरी आजचा दिवस आनंदात साजरा करतोच.
यंदा जास्त पाऊस न पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तशातच बैलपोळ्याच्या साहित्य किंमतीत वाढ झाल्याने आर्थिक अडचणीला देखील सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नाही म्हटलं तरी दुधाचे दर, पाऊस, लंपी आजार या साऱ्यांचा परिणाम बैलपोळ्याच्या सणावर पडलेला आहे.एखाद्या जनावराचे काही नाही परंतु माझ्याकडे 25 शेळ्या व 7 जनावरे आहेत त्यामुळे यावर्षी आर्थिक गणित थोडे विस्कटले आहे. – लखन जाधव (पशुपालक )