लवंग (युगारंभ )-आशियाई टेनिस क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी लवंग ता.माळशिरस ची सुवर्णकन्या ऋतुजा संपतराव भोसले हिचे सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज व पंचक्रोशीत महोत्सवी स्वागत करीत नागरी सन्मान करण्यात आला.
सुवर्णपदक मिळाल्यानंतर प्रथमच ऋतुजा ही सोलापूर जिल्ह्यामध्ये लवंग या तिच्या मूळ गावी आली होती. त्यानिमित्ताने सराटी पूल येथे भाजपाचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले. तेथून अकलूज – माळीनगर- गट नंबर 2 -पंचवीस चार मार्गे लवंग येथे तब्बल 17 किलोमीटर खुल्या जीपमधून शेकडो मोटारसायकल व चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह देशभक्तीपर गीतांच्या साथीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये छोटया मुलामुलींपासून ज्येष्ठापर्यंत सर्वस्तरातील अनेक युवक स्वागतासाठी सज्ज झाले होते.
सायंकाळी सात वाजता नागरी सन्मान व अभिनंदन करण्यासाठी हनुमान विद्यालय लवंगच्या मैदानावर लवंग पंचक्रोशीतील हजारो स्त्री- पुरुष एकत्र जमले होते. प्रास्ताविक विक्रम भोसले यांनी केले तर वडील संपतराव भोसले यांनी मुलीने केलेले कष्ट व त्यासाठी तिच्या आईने केलेला त्याग सांगत कष्टाला पर्याय नाही हे सांगून लवंगकरांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते लवंग गावचे ग्रामदैवत हनुमान यांचे प्रतीक म्हणून चांदीची गदा ऋतुजाला भेट देण्यात आली. व्यासपीठावर माजी उपसभापती प्रताप पाटील,शिवामृतचे व्हा.चेअरमन दत्तात्रय भिलारे,महेश इंगळे,गणेश इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
चौकाचौकात औक्षण आणि जेसीबीने पुष्पवृष्टी..
लवंग हद्दीमध्ये प्रवेश करताच ऋतुजा व तिच्या परिवाराचे रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत शाही स्वागत करण्यात आले. गावामध्ये जाईपर्यंत प्रत्येक चौकात चौकात अनेक मुली, स्त्रिया ऋतुजाला पाहण्यासाठी व तिचे औक्षण करण्यासाठी सडा रांगोळी काढून थांबल्या होत्या. तिच्याशी हस्तांदोलन करून सेल्फी घेण्यासाठी गर्दीचा प्रचंड उत्साह दिसून येत होता.

श्रीराम भजनी मंडळ यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आमदार राम सातपुते,आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, महेश इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सत्काराला उत्तर देताना ऋतुजा हिने लवंगकरांच्या स्वागत व प्रेमाने भारावून गेल्याचे सांगत ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून पुन्हा सन्मानासाठी येईन असे मनोगत व्यक्त केले.

यानिमित्त उत्तम भिलारे, सूर्यकांत शेंडगे,निशांत पाटील,विक्रम भोसले,प्रशांत पाटील, बिभीषण भोसले, सज्जन दुरापे, प्रशांत भिलारे यासंह पंचक्रोशीतील विविध गावचे राजकीय, सामाजिक मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार राहुल चव्हाण यांनी मानले.